डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ग्रामीण कथा म्हणजे ग्राम जीवनातील वस्तुस्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या प्रकाश शलका आहेत, प्रबोधनाच्या ज्ञानज्योती आहेत.
त्यांच्या 'माकडांच्या हाती शाळेची खिचडी' कथासंग्रहातील याच शीर्षकाची ही पहिलीच कथा अहंकार, दर्पोक्ती, अज्ञान, शैक्षणिक अनास्था, निष्काळजीपणा, कामचुकारपणा, वशिलेबाजी, यामुळे निर्माण होणाऱ्या अराजकाभोवती फिरत राहते. कथा वटारणेबाईंच्या गर्विष्ठ वृत्तीमुळे आणि इतरांच्या उदासीन, तक्रारप्रधान भूमिकेमुळे शाळेतील एक साध्या उपक्रमासाठी कसा विचका होतो हे उलगडून दाखवीत, मानवी दोषच संकटाला कसे आमंत्रण देतात हे अधोरेखित करते. कथा सामाजिक वास्तव आणि व्यवस्थेतील विसंगती ठळकपणे दर्शविते. वशिलेबाजी, अकार्यक्षमता, आणि प्रामाणिक लोकांची उपेक्षा आणि हेळसांड—हे घटक शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रालाही कसे कलुषित करतात याचा पट कथेत मांडला असून. भगवत गीतेतील “योगः कर्मसु कौशलम्” म्हणजे कर्मासाठी कौशल्य निकडीचे असते, या तत्त्वाचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवतो. कथा शाळेपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण समाज व्यवस्थेला लागू पडणारी, कालातीत आणि सार्वत्रिक सत्य अधोरेखित करणारी आहे.
*कथेचे शीर्षक* वाचकांच्या मनात एकाच वेळी हास्याची लहर आणि उपरोधाची धार निर्माण करते. शीर्षकातील *"माकडांच्या हाती"* हा वाक्प्रचार अकार्यक्षमता, अविवेक आणि गोंधळाचे प्रतीक असून *“खिचडी”* जबाबदारी आणि शालेय व्यवस्था यांचे रूपक आहे. अयोग्य हातात जबाबदारी गेली की परिणाम गोंधळातच होतो, हा आशय शीर्षकातूनच सूचित होतो. यातील “माकडं” केवळ प्रत्यक्ष प्राणी न राहता मानवी स्वभावातील चंचलता, अहंकार आणि अनुशासनहीनता यांची प्रतीके आहेत. वटारणेबाईंचा गर्व, शिक्षकांतील हेवा,मत्सर आणि मुख्याध्यापकांची निष्क्रियता, असहाय्यता आणि बोटचेपे धोरण—व्यवस्थांतर्गत असल्याचा संदेश शीर्षकातून अधोरेखित होतो. त्यामुळे “माकडं” सामाजिक अविवेकी वृत्तींची जिवंत प्रतीके ठरतात.
“खिचडी” हा शब्ददेखील बहुअर्थी आणि अर्थगर्भ आहे. ती शाळेतील मध्यान्ह भोजन योजनेचे प्रतीक असली, तरी व्यापक अर्थाने ती जबाबदारी, नियोजन आणि कर्तव्याचे द्योतक आहे. “Too many cooks spoil the broth” (सतरा सुगरणी आणि स्वयंपाक आळणी) या इंग्रजी म्हणीचा प्रत्यय या कथानकात येतो. कथेच्या उत्कर्षबिंदूवर जेव्हा प्रत्यक्ष माकडं खिचडीचे पातेले उचलून नेतात, तेव्हा शीर्षक अक्षरशः सजीव बनते आणि त्याची प्रतीकात्मकता अधिक ठळकपणे अधोरेखित होते. "After death the doctor“ या म्हणीप्रमाणे, घटनेनंतरच सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य समजते. यामध्ये एक गूढ पण प्रभावी संदेश जाणवतो. अहंकार, अज्ञान आणि दुर्लक्ष हीच खरी *माकडं* असून, *खिचडी* प्रमाणे संपूर्ण व्यवस्था विस्कळीत होत असल्याने कथेचे शीर्षक अत्यंत सार्थ, काव्यमय आणि आशयगर्भ आणि कथानकाला समर्पित ठरते.
*निवेदन शैलीचा* विचार करता ही कथा म्हणजे जणू शब्दांची एक सुरेल वीण असून, वास्तव आणि उपरोध, विनोद आणि वेदना, साधेपणा आणि गूढार्थ यांचा अद्भुत संगम येथे पहावयास मिळतो. लेखकाने तृतीयपुरुषी सर्वज्ञ दृष्टीकोन स्वीकारला असून, तो जणू आकाशातील साक्षीदार पक्ष्यासारखा प्रत्येक घटना, मनोभाव आणि संघर्षावर विहार करतो. लेखक वाचकाला दूर न ठेवता थेट घटनांच्या केंद्रस्थानी उभे करतो. त्यामुळे कथनशैली ही केवळ सांगणारी नसून “जगवणारी” बनते—जिथे प्रत्येक प्रसंग जिवंत होऊन डोळ्यांसमोर उभा राहतो.
या कथनशैलीत उपरोध आणि विडंबनाचा एक नाजूक पण धारदार धागा गुंफलेला आहे. शब्दांमध्ये विनोदाची लकेर असली तरी त्यामागे सामाजिक वास्तवाची कडू चव दडलेली आहे. लेखक सत्य मांडताना कोणताही आडपडदा ठेवत नाही. कथनशैलीतील चित्रमयता आणि प्रवाहीपणामुळे वाचकाला जणू एखादा चलचित्रपट पाहत असल्याचा भास होतो—शाळेचा गजबजाट, शिक्षकांची कुजबुज, आणि अचानक घडणारा माकडांचा हल्ला! असे प्रत्येक दृश्य शब्दांतून जिवंत उभे राहते. कथेत वास्तववाद (Realism) आणि प्रतीकवाद (Symbolism) यांचा सुंदर संगम साधला आहे. या कथनशैलीच्या साह्याने लेखक केवळ कथा सांगत नाही, तर “मनाच्या कपाटात विचारांची ठिणगी” पेटवते. सदर कथनशैली म्हणजे “शब्दांचा प्रवाह नसून, विचारांचा महासागर” आहे—ज्यात डुंबताना वाचकाला स्वतःच्याच समाजाचे आणि स्वभावाचे प्रतिबिंब दिसते.
*कथेतील पात्रांचा विचार करता* वटारणेबाई म्हणजे 'काम ना धाम अन् उघड्या अंगाला घाम' त्या अहंकाराच्या आणि आडमुठेपणाच्या रथावर आरूढ झालेल्या असून शाळेत नवीन असल्या तरी “आल्या आल्या सिंहासनावर बसल्या” च्या थाटात दिमाखात वावरतात. “भवाण्या आणि माकडं कुठे गेले?” या त्यांच्या वाक्यातून केवळ शब्द नव्हे, तर उपहासाची वज्रधारा कोसळताना दिसते. “अहंकार हा अज्ञानाचा पुत्र असतो” हे सुभाषित त्यांच्या वर्तनातून अक्षरशः साकार होते.
त्यांच्या स्वभावात “जशी करणी तशी भरणी” या नियतीचा संकेत आधीपासूनच दडलेला आहे. त्या शिपायाला हिणवतात, सहकाऱ्यांना कमी लेखतात—जणू “हातात सत्तेचा चाबूक आणि डोक्यात गर्वाचा वारा”! पण “नाचता येईना अंगण वाकडे” या म्हणीप्रमाणे, कामाचा प्रसंग आला की त्यांची खरी कसोटी लागते. खिचडीसारख्या साध्या कामातही त्यांची अकार्यक्षमता उघडी पडते. "मोठ्या घराचा पोकळ वासा, आणि वारा जाई भसाभसा" हीच त्यांची खरी ओळख ठरते. स्वतःवर संकट कोसळल्यावर त्यांच्या गर्वाचा वृक्ष उन्मळून पडतो आणि त्या “देव तारी त्याला कोण मारी” म्हणत अश्रूंना वाट मोकळी करून देतात. “उंच भरारी घेणाऱ्या पतंगाचा दोर तुटला की तो खालीच येतो” — या उक्तीप्रमाणे त्यांचा अहंकार कोसळतो. त्या स्वतःच्या चुका मान्य करत नाहीत, पण परिस्थितीसमोर हतबल होतात. त्यामुळे त्या अहंकाराच्या ज्वालेत स्वतःच होरपळणाऱ्या व्यक्तीचे जिवंत प्रतीक ठरतात.
कथेतील वाघ नावाचा शिपाई म्हणजे "नाव मोठं, लक्षण खोटं". मनाने तो अतिशय प्रांजळ असून नाव वाघ असले तरी स्वभाव कोकरासारखा आहे. कोकरू” तो अत्यंत नम्र, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ आहे. “काय म्हणता मॅडम” या त्याच्या साध्या वाक्यातून “नम्रता हीच खरी श्रीमंती” हे तत्व जाणवते. त्याच्यावर कितीही ओरड झाली, अपमान झाला, तरी तो “डोळ्यात पाणी, ओठांवर हसू” ठेवून आपले काम करत राहतो. “ज्याच्या पोटी शहाणपण, त्याच्या ओठी मौन” — ही उक्ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी शोभून दिसते.
त्याची अवस्था म्हणजे “कष्टाची कास धरली, पण मानाची आस हरवली” अशी आहे. तो सर्वांचे काम करतो, पण “घरचा जोगी जोगडा” या म्हणीप्रमाणे त्याला कोणीही महत्त्व देत नाही. त्याच्या नावाची खिल्ली उडवली जाते—“वाघ असून शेळीवाणी”—पण तो तक्रार करत नाही. “सहनशीलता हीच खरी ताकद” हे त्याच्या वागण्यातून प्रकर्षाने जाणवते.
परंतु “लहानशी ठिणगीही मोठी आग लावते” याप्रमाणे, शेवटी तोच सत्याचा दीप प्रज्वलित करतो. खिचडीतील घाण डॉक्टरांना दाखवून तो सत्य बाहेर आणतो. “सत्य लपवून राहात नाही” ही म्हण त्याच्या कृतीतून सिद्ध होते. त्यामुळे शिपाई वाघ हा जरी शांत, संयमी आणि साधा दिसत असला तरी तो सत्याचा नि:शब्द वाहक आणि प्रामाणिकतेचा दीपस्तंभ ठरतो.
कदम आणि शिंदे या शिक्षिका म्हणजे असंतोषाची धग आणि स्वाभिमानाची ठिणगी. त्या वटारणे बाईंच्या दादागिरी, वशिला, खोटी डिग्री यावर संताप व्यक्त करतात—“आम्हाला भवानी म्हणते काय?”—या वाक्यातून त्यांचा स्वाभिमान ठळकपणे दिसतो. “जिथे अन्याय, तिथे आवाज” या तत्वावर त्या उभ्या असतात. त्यांच्या शब्दांत “उपहासाचा बाण आणि सत्याची धार” दोन्हीही आहेत.
तथापि, “हाती शस्त्र पण मनात भीती” ही त्यांची स्थिती आहे. त्या तक्रार करतात, कुजबुज करतात, पण “धाडसाच्या अभावामुळे पाऊल पुढे पडत नाही.” “पाहता पाहता वेळ निघून जाते” या म्हणीप्रमाणे त्यांचा विरोध कृतीत परिवर्तित होत नाही. Rabindranath Tagore यांनी म्हटले आहे — “You cannot cross the sea by merely standing and staring at the water” — हेच त्यांच्या बाबतीत खरे ठरते. त्या कर्तव्याची वाट काटेरी चालत राहतात. त्यामुळे त्या स्वाभिमानी पण मर्यादित कृती करणाऱ्या, प्रामाणिक पण प्रणालीत अडकलेल्या व्यक्तींचे प्रतीक ठरतात.
कथेतील मुख्याध्यापक म्हणजे शांततेचा मुखवटा असले तरी निर्णयाचा अभाव हा त्यांचा दोष आहे. ते “धीरगंभीर नदीसारखे” असले तरी त्यांचा प्रवाह मात्र मंद आहे. ते सर्वांचे ऐकून घेतात, समजावतात—“जाऊ द्या, सहकार्य करा”—यातून त्यांची समंजस वृत्ती दिसते. “शांतता ही सुवर्णमूल्य असते” या विचारावर त्यांचा गाढा विश्वास आहे. पण “अति शहाणपणाने गाढव मेलं” या म्हणीप्रमाणे त्यांची अति संयमशीलता अडथळा ठरते.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात “दुधावरची साय पण ताकात मिसळलेली” अशी विसंगती आहे. ते सत्य ओळखतात, पण त्यावर ठाम भूमिका घेत नाहीत. “Agitate” हा घटक त्यांच्या नेतृत्वात अनुपस्थित आहे. घटनेनंतर ते “डोक्यावर हात ठेवून” बसतात. वेळ गेल्यावर त्यांना शहाणपण सुचते. भला माणूस पण अधुरा प्रशासक अशी ओळख ते निर्माण करतात.
कथेतील विद्यार्थी आणि गावकरी — निरागसतेचे आरसे आणि समाजाचे प्रतिबिंब
विद्यार्थी म्हणजे “कोवळी कळी”, “निर्मळ पाणी”, “भविष्याची बीजे”! त्यांना खिचडीची अपेक्षा असते, पण “हातात ताट, पण ताटात काहीच नाही” अशी त्यांची अवस्था होते. “निष्पापांवर संकट कोसळते” ही शोकांतिका त्यांच्या माध्यमातून दिसते. ते कोणत्याही चुकीचे कारण नसताना परिणाम भोगण्याच्या उंबरठ्यावर उभे राहतात.
गावकरी म्हणजे कुतूहल, भीती, चर्चा आणि अफवा यांचा संगम. “जिथे धूर तिथे आग” या म्हणीप्रमाणे ते घटनास्थळी धाव घेतात. पण “हातात काहीच नाही, फक्त बोलघेवडेपणा” अशी त्यांची मर्यादा दिसते.
सदर कथा म्हणजे *साहित्यिक अलंकारांनी* समृद्ध अशी अर्थगर्भ कलाकृती असून रूपक आणि प्रतिकात्मकता (metaphor and symbolism) यांचा येथे प्रभावी वापर केलेला आहे. “माकडं” आणि “खिचडी” ही कथानकातील केवळ घटक नसून ती गहन आशयाची प्रतीके आहेत. त्यामुळे कथेतील प्रत्येक प्रसंग, रंग, गंध, हालचाल,आणि आवाज यांनी ओतप्रोत भरलेला वाटतो. येथे शब्द कॅनव्हास बनून कथा एक जिवंत चित्रफीत ठरते. प्रतिकात्मकता हा कथेचा आत्मा असल्याने, प्रत्येक गोष्ट एक गूढ अर्थ साकारते. माकड हे चंचलता आणि अविवेककाचे रूप आहेत खिचडी ही जबाबदारी कर्तव्य आणि व्यवस्थेचे प्रतीके आहेत. खिचडीत पडलेल्या पाली निष्काळजीपणाचे विषारी बीज असून ते हळूहळू संकटाचा वणवा पेटवते. प्रतिकांच्या विनीतून कर्मफलाचा संदेश येथे उमटतो. कथेचे शीर्षकच एक व्यापक रूपक बनून संपूर्ण कथेला दिशा देते.भगवद्गीतेतील कर्मसिद्धांताची झलकही या प्रतीकांतून जाणवते.याच बरोबर कथेत उपमा आणि चित्रमयता (simile and imagery) यांचा अप्रत्यक्ष पण प्रभावी वापर केलेला आहे. वटारणेबाईंचा राग वादळासारखा उसळतो, तर माकडांचा हल्ला एखाद्या झंझावातासारखा अचानक कोसळतो. या तुलना स्पष्टपणे सांगितल्या नसल्या तरी, वाचकांच्या मनात जिवंत चित्र उभे करतात. त्यामुळे प्रसंगांची मांडणी झपाट्याने पुढे सरकते. कथा वाचकाला येथे चलचित्रपट अनुभवत असल्याचा भास होतो—हेच imagery चे सामर्थ्य आहे.
कथेत विडंबन आणि उपरोध (satire and irony) हे प्रमुख साहित्यिक साधने वापरली आहेत. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात गोंधळ, अकार्यक्षमता आणि वशिलेबाजी दिसणे हेच एक मोठे विडंबन आहे. “नाचता येईना अंगण वाकडे” या म्हणीप्रमाणे, पात्रे स्वतःच्या चुका न मानता त्याचे खापर इतरांवर फोडतात. सर्वात मोठी विडंबना म्हणजे—जिथे माणसांनी जबाबदारी पार पाडायला हवी होती, तिथे माकडं येऊन सत्य उघड करतात. इंग्रजीतील “Irony is truth wearing a mask” ही उक्ती येथे अगदी साजेशी ठरते. लेखक हसत हसत समाजातील विसंगतीवर तीक्ष्ण प्रहार करतो. थोडक्यात कथेतील उपरोध हसत हसत टोचणारा सत्याचा काटा काढणारा ठरतो. माणसाच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी माकडांनी पुढे येतात. हा उपरोध म्हणजे जणू आरशात दिसणारे विकृत प्रतिबिंबच होय. कथेतील Parody च्या वापरामुळे उपरोधाचा काव्य खेळ उभा राहतो. इथे वास्तवाचे हलके फुलके पण टोचणारे चित्र तयार होते. शिक्षण व्यवस्थेचे गंभीर रूप राजदरबारातील विदूषकाने सत्य सांगावे तशी उपहासात्मक सांगितले आहे. याशिवाय कथेत संवादतंत्र आणि विरोधाभास (dialogue technique and contrast) यांचा प्रभावी उपयोग केला आहे. वटारणेबाईंचे उर्मट, आदेशात्मक संवाद आणि शिपाई वाघाचे नम्र, संयमी बोलणे यातील विरोधाभास स्पष्ट जाणवतो. “जिभेचा घाव तलवारीपेक्षा तीव्र” या म्हणीप्रमाणे, संवादांमधूनच संघर्ष आणि ताण निर्माण होतो. पुनरुक्तीमुळे संवाद अधिक जिवंत वाटतात. त्यामुळे कथा केवळ वाचली जात नाही, तर ती “ऐकू” येते.
शेवटी, या कथेत नाट्यमयता (dramatic element) आणि नीतिकात्मकता. (allegory) यांचा सुरेख संगम दिसतो. माकडांचा अचानक हल्ला हा उत्कर्षबिंदू कथेला नाट्यमय वळण देतो, तर संपूर्ण कथा एक नैतिक बोध देणारी allegory ठरते. “अहंकाराचा अंत वाईटच” या जीवनमूल्याचा संदेश या कथेतून प्रभावीपणे व्यक्त होतो. त्यामुळे ही कथा केवळ एक घटना न राहता, ती अलंकारांनी सजलेली, विचारांना चालना देणारी आणि सामाजिक प्रतिबिंब दाखवणारी कलाकृती ठरते.
*सदर कथेचा प्लॉट* अतिशय जाळीदार व नक्षीदारपणे विणला असून, कथेचा आरंभ एका साध्यासुध्या, रोजच्या शाळकरी वातावरणातून होतो; परंतु त्या साधेपणाच्या पृष्ठभागाखाली स्पर्धा, अहंकार आणि अंतर्गत कलहाचे तरंग उसळतात. नवीन आलेल्या वटारणेबाई या आपल्या घराण्याच्या बडेजावावर आणि वशिल्यावर विसंबून शाळेत दादागिरी करू लागतात. खिचडी वाटपाची जबाबदारी त्यांच्या वाट्याला येताच, त्या इतर शिक्षकांना कमी लेखत, शिपायावर धाक दाखवत आणि आदेशांच्या फैरी झाडत स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे, कदम आणि शिंदे या शिक्षकांच्या मनात नाराजी, उपरोध आणि असंतोष दाटून येतो; मात्र ते प्रत्यक्ष कृती करण्याऐवजी कुजबुज आणि तक्रारींच्या मार्गानेच आपला विरोध व्यक्त करतात. अशा प्रकारे कथानकाच्या आरंभीच मानवी स्वभावातील विसंगती आणि संघर्षाची बीजे पेरली जातात.
कथानकाचा मध्यभाग हळूहळू ताणतणाव, गोंधळ आणि अराजकतेकडे झुकतो. खिचडी तयार करण्याची प्रक्रिया नीट पार पडत नाही—अव्यवस्था, निष्काळजीपणा आणि जबाबदारीचा अभाव यामुळे स्वयंपाकातील दर्जा घसरतो. याच दरम्यान अचानक माकडांचा हल्ला होतो आणि ते खिचडीचे पातेले उचलून वर घेऊन जातात. हा प्रसंग केवळ नाट्यमय क्लायमॅक्स नसून अत्यंत प्रतीकात्मकही आहे—ज्या ठिकाणी माणसे स्वतःच अकार्यक्षम आणि विस्कळीत झाली आहेत, तेथे निसर्ग जणू त्या गोंधळाला अधिकच उघडे पाडतो. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी या अनपेक्षित प्रसंगामुळे गोंधळून जातात; धावपळ, ओरड, आणि असहाय्यता यांचे चित्र रंगते.
कथानकाचा शेवट अनपेक्षित पण अर्थपूर्ण उलगड्याने होतो. माकडांनी फेकलेली खिचडी खाल्ल्याने जनावरे आजारी पडतात, आणि तपासाअंती खिचडीत पाली पडल्यामुळे विषबाधा झाल्याचे स्पष्ट होते. या उघडकीमुळे एकीकडे भीती आणि अपराधीपणाची भावना निर्माण होते, तर दुसरीकडे एक मोठे संकट टळल्याचा दिलासा मिळतो—कारण हीच खिचडी विद्यार्थ्यांनी खाल्ली असती, तर परिणाम भयंकर झाला असता. शेवटी “देव तारी त्याला कोण मारी” हा बोध उमटतो; मात्र त्याचबरोबर मानवी निष्काळजीपणा, अहंकार आणि व्यवस्थेतील दोष यांवरही तीव्र प्रश्नचिन्ह उभे राहते.
कथेतील *संवाद* म्हणजे जणू भावनांचा झरा, उपरोधाची धार आणि वास्तवाचे आरसे असून ते एकाच वेळी झळकवणारे शब्दफुले आहेत. प्रत्येक संवाद हा केवळ बोलणे नसून तो पात्रांच्या मनोवृत्तीचा आरसा आहे. वटारणेबाईंच्या संवादातून अहंकाराचा वणवा पेटतो—“भवाण्या आणि माकडं कुठे गेले?”—या एका वाक्यातून शब्दांचे बाण सुटतात आणि मानवी सन्मानाची राख उडते.
बोलीभाषेचा वापर कथेला जिवंतपणा देतो. ग्रामीण ढंगातील साधी, सरळ, पण अर्थगर्भ भाषा वास्तवाचा सुगंध देते. शिपाई वाघाचे “काय म्हणता मॅडम?” हे वाक्य म्हणजे नम्रतेचा ओलावा, तर त्याच्या आवाजात दडलेली भीती म्हणजे मनात धडधड, ओठांवर शब्द अशी अवस्था दर्शविते. त्याचे मौन, 'Heard melodies are sweet, but unheard are sweeter' याचा प्रत्यय देते. या संवादांमधून सामाजिक दरी स्पष्ट दिसते. कथेतील संवादांमध्ये उपरोध आणि विडंबनाची धार तीक्ष्ण दिसते. स्टाफ रूममधील कुजबुज म्हणजे जणू “अंगाराखाली दडलेली ठिणगी”! कदम आणि शिंदे मॅडम यांच्या बोलण्यातून रोष, असंतोष आणि उपहास यांचा संगम दिसतो. “आम्हाला भवानी म्हणते काय?”—या प्रश्नात केवळ शब्द नाहीत, तर स्वाभिमानाची ठिणगी पेटलेली आहे. त्या वटारणेबाईंच्या अकार्यक्षमतेवर नेमके बोट ठेवतात. संवाद कथानकाला गती देऊन उत्कर्षबिंदूकडे नेतात. वटारणेबाईंच्या आदेशात्मक वाक्यांमध्ये “मी सांगते तेच अंतिम” असा गर्व झळकतो, तर इतर शिक्षकांचे मौन म्हणजे “वादळापूर्वीची शांतता” भासते. संवादांची ही टक्कर म्हणजे जणू “शब्दांचे रणांगण”! काय बरोबर आहे यापेक्षा कोण बरोबर आहे याला येथे जास्त महत्त्व प्राप्त होते. कथेतील संवाद वाचकाला अंतर्मुख करतात. त्यातील कटुता, उपहास आणि वास्तव यामुळे कथा “हसवणारी पण टोचणारी” बनते. संवाद केवळ “शब्दांची खिचडी” नसून, ते भावनांचे, संघर्षांचे आणि सामाजिक सत्याचे जिवंत चित्रण असून येथील प्रत्येक वाक्य हा विचारांचा दीप असल्याचे निदर्शनास येते.
नेहमीप्रमाणे या कथेतही घाम फुटणे, दात वेंगाडणे, टवाळकी करणे, देव तारी त्याला कोण मारी, भीक नको पण कुत्रं आवर, आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं ते कार्ट, घरचं झालं थोडं आणि व्यायाम धाडलं घोडं" इत्यादी म्हणी व वाक्प्रचारांचा वापर लेखकाने खुबीने केला आहे.
कथेत *संघर्ष* म्हणजे जणू “धगधगत्या अंगारांचा खेळ” — दिसायला क्षुल्लक, पण परिणामाने भयंकर! सर्वप्रथम व्यक्ती विरुद्ध व्यक्ती हा संघर्ष वटारणेबाई आणि इतर शिक्षकांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. अहंकार विरुद्ध स्वाभिमान असे त्याचे स्वरूप आहे. हा केवळ वैयक्तिक नसून सन्मानाच्या जाणिवेचा आहे. कथेतील दुसऱ्या प्रकारचा संघर्ष म्हणजे व्यक्ती विरुद्ध व्यवस्था. प्रामाणिक शिक्षक आणि वशिल्याने आलेल्या, अकार्यक्षम व्यक्ती यांच्यातील विरोध म्हणजे “सत्य आणि असत्य यांचा संघर्ष” आहे. खऱ्या कर्तव्यदक्षांना दुय्यम स्थान मिळते, तर अयोग्य लोक सत्तेच्या आसनावर बसतात. हा संघर्ष समाजातील विषमता आणि अन्यायाचे प्रतिबिंब आहे. कथेमध्ये व्यक्ती विरुद्ध निसर्ग या संघर्षाचे प्रभावी चित्रण दिसते. माणसांच्या निष्काळजीपणाला निसर्ग जणू आरसा दाखवतो. खिचडी पळवून नेणारी माकडं ही अराजकतेचे प्रतीके आहेत.
शेवटी, आत्मीक संघर्ष हा सूक्ष्म पण महत्त्वाचा स्तर कथेत दिसतो. मुख्याध्यापकांच्या मनात कर्तव्य आणि भीती यांच्यातील द्वंद्व सुरू असते. “मनाशी मनाचा झगडा” आणि “धाडस नसले की निर्णय मरतो” या उक्ती त्यांच्या भूमिकेला लागू पडतात. ते सत्य ओळखतात, पण ठाम निर्णय घेत नाहीत. त्यामुळे हा संघर्ष अंतर्मनातील दुर्बलतेचा आहे. अशाप्रकारे, ही कथा बाह्य, सामाजिक आणि अंतर्मनातील या विविध स्तरांवर संघर्षाचे चित्र रंगविते.
कथेचा *संदेश* म्हणजे अनुभवाच्या भट्टीतून निघालेला सुविचारांचा सुवर्णधातू. ही कथा अहंकार विनाशाचे बीज असल्याचे सांगते. गर्विष्ठपणा संपूर्ण व्यवस्था ढासळविण्यात पुरेसा असून अहंकार आत्मविनाशाचा राजमार्ग असल्याचा संदेश प्रस्तुत कथेत मिळतो. कथा जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करते. खिचडीसारख्या साध्या कामात झालेला निष्काळजीपणाची एक ठिणगी कसा वणवा बनू शकते, याचा प्रत्यय कथानकात येतो. व्यवस्थेतील दोष सांगताना कथा वशिलेबाजीवर कठोर प्रहार करते. अयोग्य व्यक्ती सत्तास्थानावर बसल्यास संपूर्ण यंत्रणा कशी कोलमडते, हे या कथेतून स्पष्ट होते. “देव तारी त्याला कोण मारी” असे असले तरी, सजगता, जबाबदारी आणि सहकार्य याचे महत्त्व येथे अधोरेखित केले आहे. थोडक्यात काय तर ही कथा केवळ उपरोधिक नसून, ती जागृतीची घंटा आहे.
ही कथा हास्यनिर्मिती करत मनाला अस्वस्थही करते. “हसत हसत रडवणं” या पु.ल. देशपांडे यांच्या विनोदी लेखनाची छटा येथे जाणवते. सजगता, तेथे विकास — या उक्तीनेच या कथेचा सार सांगता येईल.
परीक्षणः
प्रा. बाळासाहेब रोहोकले, केडगाव - अहिल्यानगर
भ्रमणसंवादः ७५८८०२६६४४

