shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रस्तावादांचा ‘बांधावरच न्यायनिवाडा’ : कोपरगाव पॅटर्नला यश..,७५ क्लिष्ट प्रकरणे निकाली; ६० किमीहून अधिक शेतरस्ते मोकळे

शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा | 
शिर्डी:: कोपरगाव तालुक्यातील शेत-शिवार रस्त्यांवरील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादांचा निकाल थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लावण्याची अभिनव मोहीम तहसीलदार महेश सावंत यांनी हाती घेतली आहे. प्रशासनाच्या या गतिमान आणि लोकाभिमुख उपक्रमामुळे आतापर्यंत तब्बल ७५ क्लिष्ट प्रकरणे निकाली निघाली असून ६० किलोमीटरहून अधिक लांबीचे शेतरस्ते मोकळे करण्यात यश आले आहे. नुकतेच हिंगणी येथील पारधी वस्तीचा तब्बल १४ वर्षांपासून प्रलंबित असलेला वाद सामंजस्याने मिटवून या मोहिमेने आपला ७५ वा टप्पा पूर्ण केला आहे. ‘बांधावरच न्यायनिवाडा’ हा ‘कोपरगाव पॅटर्न’ आता राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र जमिनीचे विभाजन, खरेदी-विक्री आणि कौटुंबिक वाटणीमुळे जमिनीचे क्षेत्रफळ कमी होत चालले असून शेतरस्त्यांवरून वारंवार वाद निर्माण होत आहेत. या वादांमुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैसा खर्ची पडत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश सावंत यांनी ‘बांधावरच न्यायनिवाडा’ हा उपक्रम सुरू केला आहे.
हिंगणीतील १४ वर्षांचा वाद मिटला
या मोहिमेतील ७५ वे प्रकरण हिंगणी येथील पारधी वस्तीचे होते. २०१० पासून प्रलंबित असलेल्या या शेतरस्त्याच्या वादामुळे पारधी वस्तीत राहणाऱ्या सुमारे दीडशे नागरिकांना ये-जा करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा या प्रकरणातून पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले होते. तहसीलदार महेश सावंत यांनी रात्री ८.४५ वाजेपर्यंत पारधी वस्तीत थांबून सर्व संबंधितांना समजावून सांगितले. अखेरीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १४३ नुसार बांधावरच न्यायनिवाडा करून १० फूट रुंद आणि १६०० फूट लांबीचा रस्ता सामंजस्याने उपलब्ध करून देण्यात आला. या निर्णयामुळे पारधी समाजातील नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले.
संवत्सर येथे १८५ एकर शेतीसाठी रस्ता
मौजे संवत्सर येथील जाधव वस्तीवर रेल्वे विभाग व शेती महामंडळ यांच्या हद्दीमुळे निर्माण झालेला गुंतागुंतीचा प्रश्न सोडवून प्रशासनाने १८५ एकर शेतीसाठी रस्ता खुला केला.
उक्कडगाव येथे रस्ता व पाईपलाईन वाद मिटला
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४९ अंतर्गत उक्कडगाव येथील रस्ता आणि पाईपलाईनचा वाद जागेवरच सोडवून चार कुटुंबांना दिलासा देण्यात आला.
ब्राह्मणगाव टाकळीतील ५ कुटुंबांचा प्रश्न सुटला
ब्राह्मणगाव टाकळी येथील देवकर वस्तीवरील पाच कुटुंबांचा शेतरस्ता प्रश्न सोडवून २७ नागरिकांची वहिवाट सुलभ करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत करंजी, चांदेकसारे, जेऊर कुंभारी, शहाजापूर, शिरसगाव, वेस, ओगदी, पढेगाव, मळेगावथडी, रवंदे, धोडेंवाडी, सांगवी भुसार, कोकमठाण, नाटेगाव, जऊर पाटोदा, धारणागाव, देर्डे चांदवड, आपेगाव, येसगाव, कोळपेवाडी, कुंभारी, मढी, तिळवणी, गोधेगाव, वारी, काकडी, सोनेवाडी, मल्हारवाडी, देर्डे कोऱ्हाळे, धामोरी, जवळके, तळेगाव मळे, वेळापूर, हंडेवाडी, धोंडेवाडी, सडे, मनेगाव आदी गावांतील रस्तावादही सोडविण्यात आले आहेत.
उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले की, “जमिनींचे विभाजन आणि हस्तांतरणामुळे रस्त्यांवरील वाद वाढत आहेत. प्रत्येक शेताला रस्ता उपलब्ध करून देणे हा शासनाचा उद्देश असून तहसीलदार महेश सावंत यांनी आतापर्यंत ७५ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचला असून अपील प्रकरणांची संख्याही कमी झाली आहे.”
तहसीलदार महेश सावंत म्हणाले, “प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता मिळाला पाहिजे हा शासनाचा संकल्प आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बांधावरच न्यायनिवाडा’ उपक्रम राबविला. संवत्सर आणि हिंगणीच्या पारधी वस्तीसारख्या क्लिष्ट प्रकरणांतही यश मिळाले. वाद सामंजस्याने मिटल्याने गावकऱ्यांमध्ये जय-पराजयाची भावना राहत नाही, हेच या उपक्रमाचे यश आहे.”
बांधावरच न्यायनिवाडा’ या उपक्रमामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यात विश्वासाचे नवे नाते निर्माण झाले आहे. थेट बांधावर जाऊन वाद सोडविण्याच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागात सामंजस्य, पारदर्शकता आणि न्यायाचा कोपरगावचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातही असा उपक्रम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
close