शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा:-
श्रीरामपूर प्रतिनिधी:-
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ही पवित्र भूमी प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मानली जाते. या धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेला साजेशा वातावरणात रामनवमी निमित्त शहरातील ग्रामदैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरा करण्यात आला.
रामनवमीच्या पावन दिवशी प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. विशेषतः श्रीरामाच्या पाळण्याला विविधरंगी पुष्पहारांनी सजवून भक्तांसाठी भावपूर्ण वातावरण निर्माण करण्यात आले. यावेळी मंत्रोच्चार, भजन-कीर्तन आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
याच प्रसंगी जेष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे यांनी मंदिरात उपस्थित राहून प्रभू श्रीरामाच्या पाळण्याला पुष्पहार अर्पण केला व श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी सर्व नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा देत “प्रभू श्रीरामाच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सदाचार, कर्तव्यनिष्ठा आणि एकात्मतेचा संदेश रुजविणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.
दरम्यान, मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत भजन-कीर्तनात उत्साहाने सहभाग घेतला, तर युवकांनी सेवा कार्यात हातभार लावत शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था राखली.
श्रीरामपूरकरांनी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात रामनवमी साजरी करत “जय श्रीराम”च्या जयघोषात संपूर्ण शहर भारावून गेले. धार्मिक एकात्मता आणि श्रद्धेचा सुंदर संगम या उत्सवातून अनुभवायला मिळाला.

