नेवासा :
मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पिक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नसल्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले असून नेवासा तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने अहिल्यानगर येथील कृषी अधीक्षक कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अजितदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खरीप हंगामाचा उंबरठा उत्पादन अहवाल शासनाकडे सादर होऊनही विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत तातडीने निर्णय घेऊन विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर विम्याची रक्कम जमा करावी. अन्यथा नेवासा तालुका शेतकरी संघटना ॲड. अजितदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभारून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
राज्य शासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन विमा कंपन्यांना तात्काळ आदेश देऊन शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी नेवासा तालुका कायदेशीर सल्लागार ॲड. बाळासाहेब कावळे, तालुका अध्यक्ष मेजर अशोक काळे, उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे, तालुका सचिव किरण लंघे, शेतकरी नेते त्रिंबकराव भदगले तसेच नेवासा तालुका प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब नाबदे उपस्थित होते.

