श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर येथे आयोजित डॉ. Dr. B. R. Ambedkar आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक Somnath Gharge यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत पाकिस्तानच्या वारंवार बदलल्या जाणाऱ्या संविधानावर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.
मंगळवारी सायंकाळी माजी नगरसेविका सौ. अनिता प्रकाश ढोकणे यांच्या वतीने आयोजित भीमगीते व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी “महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला जगात तोड नाही,” असे गौरवोद्गार काढले.
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने अनेक वेळा संविधान लिहिले आणि बदलले, परंतु भारतात शेकडो भाषा, विविध जाती-पंथ असूनही भारतीय संविधानाने सर्वांना न्याय देण्याचे काम केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयही संविधानाच्या चौकटीतच लोकाभिमुख पद्धतीने दिले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.
“माझ्यासारखा सातारा जिल्ह्यातील खेडेगावातून आलेला व्यक्ती आज नगर जिल्ह्याचा एसपी म्हणून जबाबदारी सांभाळू शकतो, हे केवळ भारतीय संविधानामुळे शक्य झाले,” असे सांगत त्यांनी तरुणांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. “वेळ लागेल, पण यश निश्चित मिळेल,” असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.
या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डीवायएसपी भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे, नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, डॉ. जगधने, रिपाई नेते सुभाष त्रिभुवन, महिला आघाडीच्या रमाताई धिवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या प्रमुख मिनाताई जगधने, नगरसेवक आशिष धनवटे तसेच पत्रकार-कवी राजू नारायणे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली होती. संविधान, सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.

