*लातूर / प्रतिनिधी :*
कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये वडार समाजातील बांधकाम कामगारांवर मोठा अन्याय झाल्याचा गंभीर आरोप वडार समाज संघाच्या वतीने करण्यात आला आहे. कोणतीही पडताळणी न करता मोठ्या संख्येने कामगारांचे नोंदणी अर्ज रद्द करण्यात आले आहे, ही संतापजनक आणि अन्यायकारक बाब असून लोकसेवा हक्क हमी कायद्याचे उल्लंघन झाल्याने याची भरपाई द्यावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने घालून दिलेल्या सर्व अटी पूर्ण करून, ग्रामसेवकाचे सही-शिक्क्यासह बॉण्ड पेपर सादर करत आणि कामगार सेतू सुविधा केंद्रातून कागदपत्रांची तपासणी पूर्ण करूनही, अनेक कामगारांचे नोंदणी अर्ज तब्बल ८ ते ११ महिने प्रलंबित ठेवण्यात आले.
यानंतर कोणतीही प्रत्यक्ष पडताळणी न करता अचानकपणे हे अर्ज रद्द करण्यात आल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रक्रियेमुळे कामगारांचा वेळ वाया गेला, रोजगाराच्या संधी बुडाल्या आणि शासनाच्या योजनांपासून ते वंचित राहिले. एकीकडे सरकारी पातळीवरती सांगण्यात येते की, एकही लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहता कामा नये मात्र याच्या उलट लातूर कामगार कार्यालयाचा कारभार दिसून येतो, असेही यावेळी श्रीकांत मुद्दे म्हणाले.
वडार समाज संघाने याला लोकसेवा हक्क हमी कायद्याचे उघड उल्लंघन ठरवत, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त कामगारांना आर्थिक भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जर प्रशासनाने दखल घेतली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे असे सामाजिक कार्यकर्ते भटक्या- विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी रमाकांत मुद्दे, महेश गुंजाळ, सुनील पवार, सचिन वाडीकर आधी समाज बांधव उपस्थित होते.

