देवळाली प्रवरा/प्रतिनिधी
देवळाली प्रवरा शहरातील प्रसादनगर भागात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून व येथील परिसराचे सुशोभीकरण करणे हे काम आपल्या सर्वांच्या अस्मितेचे असून ते पुर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी मंगळवार दि.१४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रसादनगर येथील पुतळ्याला अभिवादन करतांना सांगितले.
प्रसंगी बोलताना ढूस म्हणाले की, ना विमान, ना हेलिकॉप्टर, ना हातात व्हाट्सॲप, ना सोबतीला मीडिया! तरीही गावकुसाबाहेरील शेवटच्या माणसापर्यंत ज्यांचा शब्द पोहोचला आणि ज्यांच्या शब्दाखातर हजारो वर्षांची गुलामगिरी झुगारून समाज ताठ मानेने उभा राहिला, अशा 'टाईम मॅनेजमेंट'च्या पलीकडील महामानवाची आज जयंती! केवळ ६५ वर्षांचे आयुष्य... त्यातली ३० वर्षे शिक्षणात गेली, उरलेल्या अवघ्या २५-३० वर्षांत त्यांनी २३ ग्रंथ लिहिले, वृत्तपत्रे चालवली, सत्याग्रह केले आणि या देशाला संविधान दिले. आज सगळी साधने असूनही आपण जिथे पोहोचू शकत नाही, तिथे बाबासाहेब आपल्या विचारांनी आणि कतृत्वाने काळजापर्यंत पोहोचले. अशा या प्रज्ञासूर्याला, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! करताना कित्येक वर्ष जुना व अर्धाकृती असलेला हा पुतळा पूर्णाकृती व्हावा व त्याभोवती सुशोभीकरण करावे अशी येथील जनतेची कित्येक दिवसांची मागणी आहे.
प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आप्पासाहेब ढूस यांचे समवेत प्रभागातील नगरसेविका पल्लवी वैभव ढूस, नंदा ढूस, प्रहार च्या शहर उप अध्यक्ष अफसाना शेख, वंदना कांबळे, शहर संपर्क प्रमुख गणेश भालके व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना ढूस म्हणाले की, कित्येक वर्षांपासून स्थापना झालेल्या येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. या बाबत सामाजिक न्याय विभाग व देवळाली प्रवरा नगरपरिषद यांचेकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. या कामास गती प्राप्त व्हावी यासाठी नगरपरिषदेचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या पुतळ्याच्या जागी नवीन, अधिक उंच व भव्य पुतळा उभारणी करणे.. तसेच परिसर सौंदर्यीकरण करणे.. त्यामध्ये पेव्हर ब्लॉक, बगीचा (लँडस्केपिंग), आणि आकर्षक विद्युत रोषणाई करणे. पुतळा व परिसराच्या रक्षणासाठी मजबुत सुरक्षा भिंत किंवा कुंपण घालणे.. परिसरामध्ये महामानवांचे विचार दर्शवणारे फलक किंवा स्मारक उभारणे आदी विविध कामांची मागणी करून आम्ही आमच्या शहराची अस्मिता उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ढूस यांनी बोलताना सांगितले.

