प्रतिनिधी | विशेष वृत्त
शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ‘जार’मधील थंड पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही ठिकाणी या पाण्यात ‘इथिलीन ग्लायकॉल’सारखे विषारी रसायन मिसळले जात असल्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यामुळे किडनी व हृदयविकाराचा धोका वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.
तज्ज्ञांच्या मते, इथिलीन ग्लायकॉल हे औद्योगिक वापरातील रसायन असून ते शरीरात गेल्यास उलट्या, चक्कर, अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसतात. गंभीर प्रकरणात किडनी निकामी होणे, मेंदूवर परिणाम होणे आणि मृत्यूचाही धोका संभवतो.
दरम्यान, अशा प्रकारे पिण्याच्या पाण्यात भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा असून ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अॅक्ट 2006’ तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 272 व 273 अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई होऊ शकते. दोषी आढळल्यास दंड व तुरुंगवासाची तरतूद आहे.
या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी जार पाण्याच्या विक्रीवर नियंत्रण ठेवून नियमित तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनीही पाणी खरेदी करताना संबंधित परवाना व दर्जा तपासूनच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००

