सोनई | प्रतिनिधी
समाजसेवा, मानवता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत महेश नवमी उत्सवानिमित्त सकल माहेश्वरी समाज, नेवासा तालुका यांच्या वतीने श्रीराम मंगल कार्यालय, सोनई येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला महिला, युवक आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवसेवेचा अनोखा आदर्श निर्माण केला.
रक्तदान हे जीवनदान मानले जाते. अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी ग्रस्त तसेच शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असते. याच सामाजिक जाणीवेतून माहेश्वरी समाजाने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये विविध वयोगटातील रक्तदाते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. रक्तदानासाठी युवकांबरोबरच महिलांनीही पुढाकार घेतल्याने शिबिराला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
या शिबिरात संकलित करण्यात आलेले रक्त अहिल्यानगर येथील जनकल्याण रक्त केंद्राच्या ब्लड बँकेस सुपूर्द करण्यात आले. या रक्तसंकलनामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्यांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
महेश नवमी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे प्रमुख संयोजक म्हणून माहेश्वरी समाजाचे जिल्हा संयुक्त मंत्री बाळासाहेब सिकची यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. तसेच नेवासा तालुका अध्यक्ष संदीप अट्टल, सचिव ओंकारनाथ बंग, तसेच माहेश्वरी युवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांनी नियोजन, जनजागृती व व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
रक्तदान शिबिरादरम्यान रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रक्तदात्यांनी देखील भविष्यात अशा उपक्रमांमध्ये नियमित सहभागी होण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजात रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, रक्ताची कमतरता भासू नये आणि अधिकाधिक नागरिकांनी या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, हा संदेश या शिबिरातून देण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, रक्तदानामुळे केवळ दुसऱ्याचे प्राण वाचत नाहीत, तर रक्तदात्याच्या आरोग्यासाठीही ते लाभदायक ठरते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले.
"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या उदात्त भावनेतून सकल माहेश्वरी समाजाने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सोनई परिसरासह संपूर्ण नेवासा तालुक्यातून कौतुक होत आहे. महेश नवमी उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच समाजहिताचा संदेश देणाऱ्या या रक्तदान शिबिराने उत्सवाला सेवाभावाचे आणि मानवतेचे अनोखे अधिष्ठान प्राप्त करून दिले.
00000

