shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ. दत्ता विघावे लिखित ​'अंपायरिंग - अ थँकलेस बट नोबल जॉब' पुस्तकाचे डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

क्रिकेटच्या नियमावलीचा आणि अनुभवांचा नवा दस्तऐवज

​लोणी : प्रतिनिधी 

क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात कठीण आणि जबाबदारीची भूमिका निभावणाऱ्या अंपायरच्या अनुभवांवर आधारित, डॉ. दत्ता विघावे लिखित 'अंपायरिंग - अ थँकलेस बट नोबल जॉब' या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते लोणी येथे संपन्न झाले.

​हे पुस्तक केवळ अंपायरिंगवर भाष्य करत नाही, तर ते या क्षेत्रातील तांत्रिक आणि व्यावहारिक बारकाव्यांचे एक उत्तम मार्गदर्शक ठरते. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, यात पंचगिरीतील आव्हाने, तांत्रिक बारकावे आणि या क्षेत्राकडे नवोदितांनी आवर्जून का वळावे, याचे सखोल विवेचन करण्यात आले आहे. तसेच, या क्षेत्रातून मिळणारे समाधान, प्रशिक्षण प्रक्रिया आणि परीक्षांशी संबंधित पूरक माहितीही यात सविस्तरपणे दिली आहे.

​याप्रसंगी डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉ. विघावे यांच्या लेखणीचे आणि क्रिकेट क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाचे विशेष कौतुक केले. अंपायरिंगसारख्या 'थँकलेस' (कृतज्ञता न मानल्या जाणाऱ्या) पण अत्यंत 'नोबल' (उदात्त) क्षेत्राला साहित्यातून मांडण्याचा डॉ. विघावे यांचा प्रयत्न तरुण पिढीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​प्रकाशन सोहळ्यानंतर डॉ. विघावे यांनी या पुस्तकाची प्रत माजी खासदार व भाजपाचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजयदादा विखे पाटील आणि श्रीरामपूरचे नगराध्यक्ष श्री. करण दादा ससाणे यांना सप्रेम भेट दिली. या मान्यवरांनी पुस्तकातील विषयाचे कौतुक करत डॉ. विघावे यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

​गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट पंच, प्रशिक्षक, समिक्षक व लेखक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. विघावे यांनी आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून हे पुस्तक साकारले आहे. क्रीडाप्रेमी आणि क्रिकेटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी हे पुस्तक एक 'हॅन्डबुक' ठरणार आहे. तेरा हजारांहून अधिक लेख, क्रिकेटचे चार ऐतिहासिक पुस्तके डॉ.विघावे यांच्या लेखणीतून साकारले आहेत.
close