*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ येथे प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत*
काळेवाडी, दि. १५ जून : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ येथे "प्रवेश उत्सव २०२६ व नवागतांचे स्वागत समारंभ" मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षाव, स्वागतगीत आणि शैक्षणिक साहित्य वितरणाद्वारे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, वर्षभरासाठी वह्या, दप्तर, टिफिन बॅग आणि पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शाळेच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावर्षी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असून, इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडून त्यामध्ये ₹१,२००/- रक्कम जमा करण्यात येणार आहे. हा उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. वनराज पोटे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असून, मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी प्रेरणादायी पाऊल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध उद्योजक प्रवीणजी काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि पालक यांच्यातील सुसंवाद व समन्वयामुळे जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावत आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असून, जिल्हा परिषद शाळांबद्दल समाजात विश्वास निर्माण होत आहे.". मुलांच्या स्वागतासाठी उपस्थित पालक वर्ग व तसेच पळसदेव ग्रामपंचायत सरपंच श्री सुभाष बनसुडे तसेच माजी सरपंच श्री आजिनाथ पवार. ग्रामपंचायत सदस्य श्री महेंद्र काळे. अनिल काळे, संजय शेलार ,महेश चव्हाण, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती श्री वनराज पोटे व उपाध्यक्ष श्री अतुल काळे. तसेच सोनाली गायकवाड ,माधुरी काळे ,अंगणवाडी सेविका संगिता चव्हाण , मदतनीस मीरा नाईकवाडी महिलाही उपस्थित होत्या. तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रताप शिरसट व सौ कांचन रणपिसे. यांनी सगळ्यांचे आभार मानले कार्यक्रमा निमित्त सर्व विद्यार्थ्यांसाठी जिलेबी व भाताच्या स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

