इंदापूर : प्रतिनिधी दि.5/6/26
इंदापूर तालुक्यामध्ये अनेक भागांमध्ये शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने केळी, डाळिंब आदी फळबागा, ऊस व शेती पिके व घरांचे पत्रे उडून जाऊन झालेल्या नुकसानी संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी तसेच इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांचेशी चर्चा झाली असून, त्यानुसार शनिवार दि. 6 पासून तातडीने नुकसानीचे पंचनामे सुरू होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात शुक्रवारी अनेक भागात प्रचंड वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच विजेच्या तारांवर झाडे, फांदया पडल्याने ठीक-ठिकाणी तारा तुटल्या आहेत. या वादळी वाऱ्याने बावडा परिसरातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने झाडे उन्मळून पडल्याने ठिकठिकाणी वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे. सध्या वीजपुरवठा चालू करण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. प्रचंड वादळी वाऱ्याने शेती पिकांच्या झालेल्या हानीचे प्रमाण मोठे असून, शनिवार पासून नुकसानीचे पंचनामे सूरू केले जाणार आहेत, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
_________________________

