shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनंतराव थोपटे यांच्या निधनाने ऋषीतुल्य नेतृत्व हरपले- हर्षवर्धन पाटील

अनंतराव थोपटे यांच्या निधनाने ऋषीतुल्य नेतृत्व हरपले- हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी दि.5/6/26
                                    राज्यातील जेष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनाने समाजाला दिशा देणारे, आदर्श मूल्ये जपणारे व जनहितासाठी आयुष्य वेचणारे अभ्यासू नेतृत्व आता आपल्यामध्ये राहिलेले नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक ऋषीतुल्य नेतृत्व गमावले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 
        अनंतराव थोपटे साहेबांनी आयुष्यभर लोकाभिमुख आणि मूल्याधिष्ठित असे राजकारण, समाजकारण केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये दुर्गम भागातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण केले. भोर तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान दिले. सर्वसामान्य नागरिकांशी कायम असलेला जिव्हाळ्याचा संबंध आणि लोकहिताची तळमळ ही त्यांची खरी ओळख होती, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
     ते पुढे म्हणाले, माझे काका शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी जिल्ह्यात व राज्यात अनेक दशके राजकारण केले. अनंतराव थोपटे साहेबांकडून  पुणे जिल्हा सहकारी दूध संघ कात्रजचा संचालक असताना माझ्यासारख्या जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक अनुभवी,  ग्रामीण जनतेची नाळ ओळखणारा नेता हरपला आहे. साधी राहणी, सर्वसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते ही त्यांची वैशिष्ट्ये होती.  
     थोपटे साहेबांनी राज्यामध्ये विविध खात्याची मंत्रिपदे सांभाळताना शिक्षण, परिवहन दुग्धविकास, मत्स्यविकास आदी क्षेत्रात घेतलेले असंख्य लोककल्याणकारी निर्णय आजही जनतेच्या स्मरणामध्ये आहेत. आज त्यांचा वारसा माजी आमदार संग्राम थोपटे पुढे चालवीत आहेत. संग्राम थोपटे व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी, या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
•चौकट:-
दुग्ध क्षेत्राच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा!
--------------------------------
थोपटे साहेब राज्याचे दुग्धविकास मंत्री राहील्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघा (महानंदा) च्या विकासामध्ये सिंहाचा वाटा होता. तसेच राज्यात अतिरिक्त दूध उत्पादन होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी राज्यात दूध महापूर योजना चालू केली, त्यामुळे राज्यातील दुग्ध क्षेत्राची प्रगती होऊ शकली, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

___________________________
फोटो-अनंतराव थोपटे
close