shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कवी भगतसिंग दंडवते (पनवेल) यांना प्रतिष्ठेचा 'विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार' प्रदान!



पुणे प्रतिनिधी:
मंगळवार, दि. ०२ मे २०२६ रोजी पुणे येथील ऐतिहासिक एस. एम. जोशी सभागृहात 'विश्वबंधुता साहित्य परिषद', विश्वबंधुता मूल्यवर्धन समिती आणि 'काषाय प्रकाशन संस्था, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने बंधुताचार्य आदरणीय प्रकाशजी रोकडे सर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त 'अभिष्टचिंतन सोहळा, ग्रंथ प्रकाशन, कवी संमेलन आणि विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार' सोहळा अत्यंत दिमाखात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या दिमाखदार सोहळ्याचे अध्यक्षपद ज्येष्ठ विचारवंत व कविवर्य प्रा. चंद्रकांतदादा वानखेडे यांनी भूषवले, तर स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. अरुण आंधळे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर बंधुताचार्य प्रकाशजी रोकडे यांच्यासह त्यांच्या सहचारिणी सौ. मंदाकिनी रोकडे ताई, आदरणीय ॲड. प्रार्थना सदावर्ते ताई, संगीता झुंजुरके ताई, कवी प्रा. शंकर आथरे सर, डॉ. अशोक पगारीया सर आदि मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांतदादा वानखेडे यांनी आपल्या ओजस्वी वाणीने 'ध्वज मानवतेचा' या गीताने भाषणाची सुरवात करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. "तळागाळापर्यंत बंधुतेचे आणि समानतेचे विचार पोहोचले पाहिजेत. विश्वबंधुता परिषदेने मोठमोठ्या साहित्यिकांचा विचार न करता, माझ्या सारख्या तुमच्या- आमच्यातल्या एका सामान्य माणसाला पारखून अध्यक्षपदी निवड केली, ही माझ्यासाठी अत्यंत आनंददायी बाब आहे," असे ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.
या भव्यदिव्य सोहळ्यात पनवेल येथील प्रसिद्ध कवी भगतसिंग दंडवते यांना बंधुताचार्य आदरणीय प्रकाशजी रोकडे यांच्या हस्ते आणि त्यांचे साहित्य 'गुरू' आदरणीय प्रा. चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठित 'प्रकाशदूत पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून, त्यांच्या सामाजिक लेखणीवर आणि 'काव्यपुष्प साहित्य मंच समूहा'च्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अखंड साहित्य सेवेवर रसिकांनी दाखवलेला विश्वास आहे. "लेखणी जेव्हा समाजाच्या कल्याणासाठी आणि समानतेसाठी चालते, तेव्हा मिळणारा पुरस्कार हा एका व्यक्तीचा राहत नसून, त्याने जपलेल्या मूल्यांचा सर्वोच्च सन्मान असतो," अशी भावना या प्रसंगी व्यक्त झाली. साहित्य क्षेत्रातून दंडवते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बंधुताचार्य आदरणीय प्रकाशजी रोकडे यांनी आपल्या तेजस्वी भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. "बंधुत्व आणि समता हीच खरी महात्मा बुद्धांची शिकवण होती. याच विचारातून आणि भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेऊन, गेल्या ५० वर्षांपासून आम्ही बंधुत्व आणि समतेच्या विचारांची अविरत पेरणी करत आहोत," असे ते म्हणाले. याच सोहळ्यात पुढील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. वसंत बुगडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. ७० व्या वाढदिवसानिमित्त रोकडे सरांनी उपस्थितांच्या शुभेच्छांचा आदरपूर्वक स्वीकार केला.
या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रा. शंकर आथरे सरांनी स्वतः लिहिलेले व गायलेले 'संविधान गीत' होय. या प्रसंगी संपूर्ण सभागृहाने उभे राहून या गीताला मानवंदना दिली. या सोहळ्याचे अभ्यासपूर्ण आणि नेटके सूत्रसंचालन आदरणीय संगीता झुंजुरके ताई यांनी आपल्या मधुर आवाजात केले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात सभागृहाला हसते-खेळते ठेवत या दिमाखदार सोहळ्याची यशस्वी सांगता केली.
close