मॉडेल स्कूल भोसलेवस्ती येथे वसंतराव नाईक जयंती व कृषी दिन उत्साहात साजरा.
इंदापूर: मॉडेल स्कूल भोसलेवस्ती येथे हरितक्रांतीचे शिल्पकार तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कृषी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी कृषी दिंडी व प्रभातफेरी काढून शेती, पर्यावरण संवर्धन आणि अन्नधान्याचे महत्त्व याबाबत जनजागृती केली. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कडधान्ये, तृणधान्ये, औषधी वनस्पती, विविध फळे, भाज्या आणि तेलबिया यांचे आकर्षक व माहितीपूर्ण प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना विविध पिकांची ओळख, त्यांचे पोषणमूल्य आणि कृषी क्षेत्रातील महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमात सद्गुरू कृषी महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, सेंद्रिय शेती, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका आशा नष्टे, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि कृषी क्षेत्राबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.

