shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महावितरणच्या दडपशाही विरुद्ध वंचित बहुजन आघाडी आक्रमक दोषी असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावाअन्यथा आंदोलन - जिल्हा संघटक कसबे

अजीजभाई शेख/ राहाता
राहाता तालुक्यातील मौजे पिंपळस येथील नागरिकांची महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून वीज ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याबाबत समस्त त्रस्त वीज ग्राहकांनी वंचित बहूजन आघाडी चे जिल्हा संघटक दिपक बाळू कसबे यांचेकडे आपली कैफियत मांडली,त्या अनुषंगाने दिपक कसबे यांनी संबंधित दोषींवर योग्य कारवाई आणी समस्त वीज ग्राहकांना उचित न्याय मिळावा याबाबत संबंधित प्रशासनास निवेदनाद्वारे वीज ग्राहकांना न्याय आणी संबंधित दोषी असणाऱ्यांवर योग्य कारवाई व्हावी याकरीता निवेदन दिले आहे, येत्या ७ दिवसांत संबंधित दोषींवर योग्य कारवाई न झाल्यास वंचित बहूजन आघाडी कडून उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,राहाता तालुक्यातील मौजे पिंपळस येथील नागरिकांची महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून आर्थिक लूट सुरू असून महावितरणचे राहाता येथील एका सहाय्यक अभियंत्याच्या सांगण्यावरुन महावितरण कर्मचाऱ्यांनी दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ पासून पिंपळस गावातील नागरिकांच्या घरातील कार्यरत वीज मीटर कोणतीही पूर्वसूचना न देता अथवा त्यांची लेखी संमती न घेता जबरदस्तीने काढून नेले व त्याजागी नवीन स्मार्ट मीटर बसविले.

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर नागरिकांची वीज बिले तीप्पट,चौपट आहेत. 
वीजेचा वापर आहे तोच असूनही रु.५०० चे बिल आता रु. २००० पर्यंत येत आहे. याबाबत नागरिकांनी महावितरण कार्यालयात ३० दिवसांपासून वारंवार तोंडी तक्रारी केल्या. मात्र उडवाउडवीची उत्तरे देवून चक्क त्यांना दमदाटी देखील करण्यात येत आहे. 

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकाचा जुना मीटर क्रमांक व नवीन स्मार्ट मीटरचा क्रमांक सिस्टीममध्ये एकच दाखवून महावितरणकडून  वीज ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. मीटर बसविताना कोणताही पंचनामा केला नाही.
हा प्रकार भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम ३१८ - फसवणूक, कलम ३५१ - बळजबरी व कलम ३२४ - सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असून ग्राहक संरक्षण कायद्याचा उघड भंग असल्याचे म्हटले आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे उत्तर अहिल्यानगर जिल्हा संघटक दीपक बाळू कसबे यांच्या नेतृत्वाखाली राहाता पोलीस स्टेशन, राहाता तहसील कार्यालय याठिकाणी लेखी तक्रार निवेदन देऊन संबंधित दोषी सहाय्यक अभियंता व त्यांचे संबंधित महावितरण कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जर ७ दिवसात कायदेशीर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालय, पिंपळस / राहाता येथे  तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

यावेळी समाजसेवक रावसाहेब बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते भरत भाऊ निकाळे, किशोर भाऊ पठारे, अनिल भाऊ आवारे, शंकर दादा गायकवाड, जय भोसले, अनुराग निकम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
close