shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा खरेदीचे आवाहन.

कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा खरेदीचे आवाहन.
इंदापूर, दि. १ जुलै : कृषी दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगामासाठी खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. तसेच तालुक्यात खरीप हंगामासाठी आवश्यक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी कोणतीही घाई अथवा अनावश्यक साठेबाजी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सध्या इंदापूर तालुक्यात युरिया – ४,९०० मेट्रिक टन, डी.ए.पी. – ४०० मेट्रिक टन, एस.एस.पी. – २,४०० मेट्रिक टन, एन.पी.के. – ६,७०० मेट्रिक टन, तसेच एम.ओ.पी. – ३१० मेट्रिक टन इतका खतसाठा उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार खतांचा पुरवठा नियमितपणे सुरू असून शेतकऱ्यांनी आपल्या गरजेनुसारच खतांची खरेदी करावी.असे आवाहन कृषी अधिकारी, गुणनियंत्रण श्री. योगेश फडतरे यांनी केले.

शेतकऱ्यांनी केवळ कृषी विभागाकडून परवानाधारक विक्रेत्याकडूनच खते, बियाणे व कीटकनाशकांची खरेदी करावी. खरेदी करताना पक्के बिल किंवा कॅश मेमो घेऊन ते जतन करून ठेवावे. बियाणे खरेदी करताना वाण, बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, अंतिम वापर दिनांक व उगवणक्षमता तपासावी. खतांच्या पिशवीवरील दर्जा, अन्नद्रव्यांचे प्रमाण, वजन व उत्पादकाची माहिती पडताळून पाहावी. कीटकनाशके खरेदी करताना शिफारस केलेली व वैध कालावधीतील उत्पादनेच वापरावीत.

कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये. अनधिकृत विक्रेत्यांकडून किंवा बिलाशिवाय कृषी निविष्ठा खरेदी करू नयेत. संशयास्पद दर्जा, जादा दर आकारणी, बिल न देणे किंवा इतर अनियमितता आढळल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा. तक्रार करताना खरेदीचे बिल, पॅकेट, लेबल व इतर आवश्यक पुरावे जतन करून ठेवावेत, जेणेकरून संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करता येईल.

कृषी विभागामार्फत तालुक्यातील खत, बियाणे व कीटकनाशक विक्रेत्यांची नियमित तपासणी, नमुना संकलन व गुणवत्ता नियंत्रणाची कार्यवाही सुरू आहे. शेतकरी बांधवांनी कोणतीही तक्रार किंवा अडचण असल्यास कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय, इंदापूर व कृषी अधिकारी पंचायत समिती इंदापूर   येथे संपर्क साधावा.

कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांनी दर्जेदार कृषी निविष्ठांचा वापर करावा, अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, शिफारशीनुसार खतांचा संतुलित वापर करावा आणि आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे, असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे.
close