धर्मपीठावरून लोकशाहीला पाठबळ; प्रांताधिकारी सावंत पाटलांनी सरला बेटावर जाऊन भरले महंत रामगिरी महाराजांचे गणना पत्र
वडाळा महादेव [ वार्ताहार ] लोकशाहीच्या शुद्धीकरणासाठी सध्या सुरू असलेल्या ‘विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेला आता आध्यात्मिक अधिष्ठानाची जोड मिळाली आहे. धार्मिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व आणि श्री सद्गुरू गंगागिरी महाराज गोदाधाम सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे गणना पत्र श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी स्वतः सराला बेटावर जाऊन भरून घेतले. यानिमित्ताने प्रशासन आणि अध्यात्म यांचा एक दुर्मिळ संगम पाहायला मिळाला.
प्रांताधिकारी सावंत पाटील यांनी महंत रामगिरी महाराज यांना या मोहिमेची इत्यंभूत माहिती दिली. या प्रसंगी बोलताना प्रांताधिकारी म्हणाले की, “मतदारयादीची पवित्रता ही लोकशाहीच्या अस्तित्वाची गुरुकिल्ली आहे. एकही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठीची ही एक प्रकारे संविधानिक साधनाच आहे.” या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी महंतांच्या विस्तीर्ण भक्त परिवारापर्यंत हा संदेश पोहोचावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच, “आपल्या वाणीतून आणि आशीर्वादातून भक्तांना आपापल्या बीएलओ (BLO) कडे गणना पत्र भरून देण्याचे आवाहन करावे,” अशी विनंतीही त्यांनी महंतांना केली.
महंत रामगिरी महाराज यांनी प्रशासनाच्या या उपक्रमास तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. "प्रत्येकाने या राष्ट्रीय कर्तव्यात आणि लोकशाहीच्या बळकटीकरणात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे," असे आवाहन त्यांनी आपल्या भक्तगणांना व नागरिकांना केले.
या प्रसंगी स्विप नोडल अधिकारी गणेश पिंगळे, संदिप पाळंदे आणि बीएलओ काजल आसने उपस्थित होत्या. आध्यात्मिक केंद्रातून मिळालेल्या या पाठबळामुळे श्रीरामपूर तालुक्यात 'एसआयआर' मोहिमेला एक नवचैतन्य मिळाले असून, प्रशासन आणि समाज यांच्यातील सेतू अधिक दृढ झाला आहे.

