संघटन सृजन अभियानानंतर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; सचिन चौगुले यांच्यावर शिर्डी ब्लॉकची धुरा
शिर्डी प्रतिनिधी:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ या देशव्यापी उपक्रमानंतर शिर्डी ब्लॉक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी सचिन चौगुले यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. दि. १७ जुलै २०२६ रोजी ही घोषणा करण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे शिर्डी व राहाता तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडीबद्दल सचिन चौगुले यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री ना. बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानले. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीपजी, प्रदेश सरचिटणीस प्रभावतीताई घोगरे, उत्तर जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ गुजर आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष किरणजी पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सचिन चौगुले म्हणाले की, आदरणीय ना. बाळासाहेब थोरात साहेब आणि जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी व विद्यमान पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि प्रशासन यांना सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्यात येईल. गोरगरीब, शेतकरी, व्यापारी आणि बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवून अन्याय व अत्याचाराविरोधात लढा दिला जाईल.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचा विचार घराघरापर्यंत पोहोचविण्यासोबतच संघटना वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आगामी काळात शिर्डी आणि राहाता तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या संघटन सृजन अभियानासाठी झारखंड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेश ठाकूर, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि प्रदेश काँग्रेसचे श्रीकृष्ण सांगळे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या वरिष्ठ नेत्यांनी सलग तीन ते चार दिवस संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून स्थानिक संघटनेचा आढावा घेतला. त्यानंतर करण्यात आलेल्या या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
सचिन चौगुले यांच्या निवडीमुळे शिर्डी ब्लॉक काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

