shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घ्या समजून राजेहो...रामदेव बाबांचे असे काय चुकले..?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत..!!


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

या भारतातील सर्व मुस्लिम बांधव हे मूळचे सनातनी हिंदूच आहेत. त्यामुळे हा देश हिंदुस्तानच आहे, अशा आशयाचे विधान योगगुरु आचार्य रामदेवबाबा यांनी केले असल्याची बातमी आहे. त्यांच्या या विधानामुळे देशभरात सहाजिकच खळबळ उडाली असून राजकीय नेते त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. 


रामदेव बाबांना विरोध करणारे सर्वसाधारणपणे देशातील डाव्या विचारसरणीचे कथित पुरोगामी तसेच काँग्रेसी आणि मुस्लिम नेते हेच आघाडीवर आहेत. त्याला कारणेही तशीच आहेत. डाव्यांना या देशात हिंदूंचा विचार नकोसाच झालेला आहे. तर काँग्रेसला देखील हिंदुत्व नकोच आहे, कारण मुस्लिम समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना त्यांची एक गठ्ठा मते हवी आहेत. मुस्लिमांचा तर हिंदुत्वाला विरोध असणे स्वाभाविकच आहे. त्यांच्या नेत्यांना हा देश हिंदूंचा न राहता मुस्लिम देश व्हावा हेच हवे आहे. त्यामुळे हीच सर्व मंडळी विरोध करणाऱ्यात आघाडीवर आहेत.

वस्तूतः रामदेवबाबांच्या विधानात काहीही चुकलेले नाही. त्यांनी वस्तूस्थितीवर आधारितच विधान केलेले आहे. मात्र काहींना आपल्या राजकीय स्वार्थासाठी किंवा इतर विहित स्वार्थांसाठी वस्तुस्थिती मान्यच करायची नाही. त्यामुळे त्यांची ओरड चालू आहे आणि ती अशीच चालणार आहे.

भारतात सनातरी हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन धर्म म्हणून मानला गेलेला आहे. संशोधकांच्या मते हा धर्म दहा हजार वर्षे तरी जुना असावा असे म्हटले जाते. त्या तुलनेत मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध, जैन, पारशी हे सर्वच धर्म खूपच नवे आहेत. भारतात अगदी प्राचीन काळापासून वैदिक सनातनी जीवनपद्धतीच स्वीकारली गेली होती. मात्र दोन सहस्त्रकांपूर्वी बौद्ध धर्म अस्तित्वात आला. त्या पाठोपाठ जैन धर्म देखील अस्तित्वात आला. बौद्ध आणि जैन धर्मात गेलेले बहुतेक भारतीय हे मूळचे सनातनी हिंदूच आहेत. 

याच कालखंडात पंजाब सिंध या परिसरात गुरुनानक यांनी शीख पंथाची स्थापना केली होती. त्यामुळे काही प्रमाणात शीख बांधव देखील आपल्या देशात आहेत. मात्र त्यांचेही मूळ हे सनातनी हिंदूंमध्येच सापडते.

साधारणतः आठव्या शतकापासून आपल्या देशावर उत्तरेकडून मुस्लिमांनी आक्रमण करणे सुरू केले. त्यांनी एकेक राज्य पदाक्रांत करीत तिथे तलवारीच्या जोरावर तिथल्या हिंदूंना  बाटवून मुस्लिम बनवणे सुरू केले. आपल्या देशाचा खरा इतिहास तपासल्यास असे तलवारीच्या जोरावर बाटवून धर्मांतर केल्याच्या अनेक नोंदी सापडतील. प्रख्यात कन्नड साहित्यिक भैरप्पा यांच्या आवरण या कादंबरीत अशा धर्मांतराच्या अनेक नोंदी सापडतात. इतरही साहित्यात तसेच जुन्या बखरीमध्ये याची माहिती मिळते.

मुस्लिमांना भारताचे राज्य तर बळकवायचे होतेच, पण इथे हिंदू धर्म न ठेवता सर्वांना मुस्लिम करायचे होते. त्यासाठी त्यांनी हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे फोडणे सुरू केले आणि जो देव स्वतःचे रक्षण करू शकत नाही तो तुमचे काय करणार असे सांगून हिंदूंना बाटवणे सुरू केले. अयोध्यातील प्रभू रामचंद्र यांच्या राम मंदिराचा संघर्ष ताजाच आहे. शिवाय मथुरा आणि काशी येथील मंदिरांचाही संघर्ष केव्हाही होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. याच पद्धतीने मुस्लिमांनी असंख्य मंदिरे फोडली आणि तिथे मशिदी उभ्या केल्या. कित्येक मशिदी नुसत्याच उभारल्या गेल्या होत्या. तिथे कधीही नमाज अदा केला जात नव्हता. अयोध्येतील राम मंदिर प्रकरणात न्यायालयात खटला सुरू असताना ही बाब समोर आली होती.

मुस्लिमांनी इथे हिंदूंचे साम्राज्य बळकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देशातील हिंदू संघटित नव्हते. त्यामुळे छोटी छोटी हिंदू राज्ये जिंकणे त्यांना सहज शक्य होते. तरीही पंजाब, राजस्थान आणि दक्षिणेतील काही राज्यांत तिथल्या राजांनी त्यांना विरोधही केला होता. राजपुतांच्या अनेक गडकिल्ल्यांवर त्यांच्या राण्यांनी केलेले जोहार इतिहासात नोंदले गेलेले आहेत. मोगली साम्राज्याला खरे ललकारले गेले ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून. त्यांनी औरंगजेब बादशहाला त्याची राजधानी सोडून अनेक वर्षे महाराष्ट्रात खिळवून ठेवले होते. शेवटी औरंगजेबाला मृत्यू देखील महाराष्ट्रातच आला होता. शिवाजीनंतर संभाजी, त्यांचे बंधु राजाराम, पुत्र शाहू महाराज, यांनी आणि नंतर त्यांच्या पेशव्यांनी मुघलांशी चांगली लढत दिली आणि मराठ्यांचे साम्राज्य सर्वदूर पोहोचवले होते. तरीही या काळात मोठ्या प्रमाणात मोगलांनी हिंदूंना बाटवले आणि मुस्लिम करून घेतले होते. छत्रपती संभाजी महाराजांना देखील मुस्लिम करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला होता, याच्या नोंदीही इतिहासात सापडतात.

साधारणतः १३ व्या १४ व्या शतकात ख्रिस्ती लोक व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले. मात्र त्यांचा छुपा हेतू हा भारताचे राज्य बळकावणे आणि इथे बहुसंख्य भारतीयांना ख्रिस्ती बनवणे हाच होता. मुस्लिमांनी तलवारीच्या जोरावर हिंदूंना बाटवले. मात्र ख्रिश्चनांनी भोळ्या भाबड्या हिंदूंना फसवून त्यांना धर्मांतर करायला लावले होते, अशा नोंदी इतिहासात सापडतात. कुठे पूर आला किंवा साथीच्या रोगांची साथ आली की हिंदूंच्या मदतीला धावून जायचे आणि मग त्या बदल्यात त्यांना ख्रिस्ती बनवायचे, अशाप्रकारे त्यांनी आपले काम सुरू ठेवले होते. आजही असे छुप्या धर्मप्रसाराचे काम सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वीच पंढरपूरच्या वारीत काही ख्रिस्ती धर्मप्रसारक धर्मप्रसार करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. नंतर हळूहळू त्यांनी देशाची सत्ता देखील मिळवली आणि दीडशे वर्षे भारतावर राज्य केले होते त्या काळात अनेक हिंदूंना पाठवून त्यांनी ख्रिस्ती बनवले होते. आजही ग्रामीण भागात मंदिरांसोबत  मशिदी देखील जागोजागी उभ्या दिसतात त्या त्यामुळेच. 

इंग्रजांशी जेव्हा संघर्ष सुरू होता, तेव्हा हिंदू आणि मुस्लिम हे दोघेही एकत्र येऊन संघर्ष करत होते. मात्र त्यातही मुस्लिमांना या देशावर सत्ता हवी होती. इंग्रजांनी जेव्हा स्वातंत्र्य द्यायचे ठरवले तेव्हा पंतप्रधान नेहरूंनी व्हावे की मुस्लिमांचे नेते असलेल्या बॅरिस्टर जीनांनी यावर वाद झाला होता. शेवटी इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे करून मगच ते परत गेले होते. 

पाकिस्तान वेगळा झाला त्यावेळी तिकडले बहुसंख्य हिंदू भारतात परत आले. तरीही मुस्लिम मोठ्या संख्येत इथेच राहिले आणि आपले धर्माप्रसाराचे काम त्यांनी सुरूच ठेवले. ते आजही सुरूच आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागात किंवा वन्य भागात गोरगरीब हिंदूंना बाटवून मुस्लिम केले जातेच. 

हे बघता या देशात जे काही मुस्लिम आहेत ते मूळचे हिंदूच होते, या रामदेव बाबांच्या दाव्यातील वास्तव नाकारता येत नाही. काही वर्षांपूर्वी भारतातील धर्मांतर या विषयावर मी अभ्यास सुरू केला होता. त्या विषयावर विस्तृत लेखन करण्याचा देखील माझा विचार होता. मात्र दुर्दैवाने हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. मात्र अभ्यास बऱ्यापैकी झाला. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्वच मुस्लिम जरी मूळचे सनातनी हिंदू नसले तरी ९५ ते ९७ टक्के मुस्लिम हे मूळचे हिंदूच आहेत. इतकेच काय पण आजच्या पाकिस्तान मध्ये असलेले मुस्लिम देखील बहुसंख्य हिंदूच आहेत. त्या काळात धर्मजागरण मंचाच्या काही अभ्यासाकांशी मी चर्चा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही भारतात तीर्थक्षेत्री जुन्या वंशावळी सापडतात. त्यांचा अभ्यास केल्यास कित्येक मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे मूळ हिंदूच होते ही माहिती पडताळता येते. मात्र तसा अभ्यास झालेला नाही. 

याच पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वसंघाचालक डॉ. मोहन भागवत यांनी या देशात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांचा डीएनए एकच आहे, असे विधान केले होते. त्यावर वाद देखील बराच झाला होता. मात्र वरील मुद्दे लक्षात घेतले तर मोहन भागवतांच्या विधानातील वास्तव देखील विचारात घ्यावेच लागते.

ही बाब लक्षात घेतली तर इथले मुस्लिम आणि ख्रिश्चन हे मूळचे सनात आणि हिंदूच होते हा आचार्य रामदेव बाबांचा दावा मान्य करावाच लागतो. जर या मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना त्यांचे मूळ शोधून किंवा मग अन्य मार्गाने त्यांना परत हिंदू धर्मात आणले तर या देशातील अर्ध्याहून अधिक समस्या सुटू शकतील यात शंका नाही. त्याचप्रमाणे हिंदूंचा देश तो हिंदुस्थान म्हणून भारताला देखील हिंदुस्तान या नावाने जागतिक मान्यता मिळू शकेल हे देखील नक्की. त्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषद धर्म जागरण मंच वनवासी कल्याण आश्रम अशा संघटनांचे प्रयत्न देखील सुरू आहेत. मात्र २०१४ पर्यंत देशात सत्तेत असलेल्या काँग्रेसी सरकारने त्यांचे हिंदू विरोधी आणि मुस्लिम धार्जिणे धोरण राबवत हिंदूंना गैरसोयीचे ठरतील असेच अनेक कायदे केले होते. अर्थात आता गेल्या बारा वर्षात देशात उजव्या विचारांची सत्ता असल्यामुळे परिस्थिती हळूहळू बदलते आहे. मात्र ती अधिक वेगाने बदलायला हवी. विशेषतः या देशात तत्काळ समान नागरी कायदा लागू व्हायला हवा. संविधानातील तिसावे कलम रद्दबातल ठरायला हवे. तसेच झाले तर बऱ्याच समस्या कमी होऊ शकतात. 

तरीही या मुद्द्यावर ज्यांना राजकारण करायचे आहे, ते करतीलच याच शंका नाही. सध्या देखील तेच सुरू आहे. रामदेव बाबा यांनी दिल्लीत विधान करताच काँग्रेसचे नेते, मुस्लिम नेते आणि डाव्या विचारांचे इतर विचारवंत रामदेव बाबांवर तुटून पडले आहेत. रामदेव बाबा म्हणजे देशाचे संविधान आहे का असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. 

देशातील मुस्लिम समाज हा हिंदू आणि ख्रिश्चनांच्या तुलनेत अजूनही मागासलेला आहे. त्यामुळे ते मुल्ला मौलवींच्या मागे झापडे बांधून धावत असतात. त्याचाच फायदा आज काँग्रेस आणि डावे राजकारणी घेतात. ते मुल्ला मौलवींना हाताशी धरून या झापडे बांधून धावणाऱ्या मुस्लिमांची मते मिळवतात आणि सत्ता काबीज करतात. म्हणूनच त्यांचा रामदेव बाबांना विरोध चालू आहे. 

मात्र या देशातील राष्ट्रप्रेमी हिंदूंनी हा विषय समजून घेत रामदेव बाबांचे कुठेही चुकलेले नाही या ठाम मतावर राहुल रामदेव बाबांना पाठिंबा द्यायला हवा, आणि या डाव्या मंडळींच्या नांग्या ठेचायला हव्यात. तरच ते ठिकाणावर येतील आणि मतांसाठी लांगुलचालन करणे बंद करतील हे नक्की. 

वाचकहो पटतेय का तुम्हाला हे....?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो...

या विषयावर वाचकांची स्पष्ट आणि परखड मते अपेक्षित आहेत. त्यांचे स्वागतच होईल.
close