shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी ते पंढरपूर पायी पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान; शिर्डीत मान्यवरांच्या हस्ते स्वागत!



श्री क्षेत्र शिर्डी ते पंढरपूर पायी पालखी सोहळा:श्री साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत व पालखी पूजन

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र पंढरपूर या भव्य आणि पवित्र पायी पालखी सोहळ्याचे आज मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज परमहंस आणि श्री गुरुस्वामी सच्चिदानंदजी महाराज परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या या सोहळ्याचे श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने भक्तीमय स्वागत व पालखी पूजन करण्यात आले.
सदर पालखी सोहळ्याचे प्रस्थान निमगाव येथील श्री साई ज्ञानेश्वर महाराज मंदिर परमहंस आश्रम येथून पूजन व आरती करून झाले. त्यानंतर श्री साईबाबा मंदिराजवळील शताब्दी मंडप येथे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली. हा भव्य पायी पालखी सोहळा गुरुवार दि. ९ जुलै ते रविवार दि. २६ जुलै २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी महंत काशिकानंदजी महाराज यांचा शाल देऊन सत्कार केला व सर्व वारकऱ्यांना सुखकर प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना गाडिलकर म्हणाले की, "गेल्या २० वर्षांपासून हा पालखी सोहळा अविरतपणे सुरू आहे. साईबाबा आणि पंढरीचे नाते अतूट आहे. दररोज पहाटे 'शिर्डी माझे पंढरपूर' या आरतीनेच बाबांच्या दर्शनाची सुरुवात होते. साईचरित्रात बाबांनी गवळी बुवांना शिर्डीतच पांडुरंगाचे दर्शन घडवल्याचा उल्लेख आहे. आपला अहंकार दूर करण्यासाठी वारीत सहभागी होणे हे प्रत्येकासाठी मोठे भाग्य आहे."
महंत काशिकानंदजी महाराज यांनी या भव्य आयोजनासाठी श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांचे विशेष आभार मानले. "संस्थानच्या विद्यमान अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे या सोहळ्याला अधिक बळ व भव्यता प्राप्त झाली आहे," असे सांगत त्यांनी वारकऱ्यांना प्रवासात शिस्त आणि स्वच्छतेचे पालन करत भक्तीभावाने मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याप्रसंगी महंत काशिकानंदजी महाराज, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, ग्रीन अँड क्लीनचे अजित पारख, मणिलाल पटेल, व्हॉइस चेअरमन पोपटराव कोते, सचिव विलासराव वाणी, ठकाजी काटकर, पाराजी वैद्य, ज्ञानेश्वर वदक, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शिंदे, आसारामजी वारे, चोपदार नवनाथजी थोरे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, वारकरी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'ओम साईराम' आणि 'विठ्ठल... विठ्ठल...'च्या जयघोषात भक्तिमय वातावरणात पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
close