shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मसुदा समिती स्थापना दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या स्थापना दिनानिमित्त २९ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना केली होती. या समितीने स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याची ऐतिहासिक जबाबदारी पार पाडली. मसुदा समिती स्थापनेच्या ७९ व्या वर्षपूर्तीनिमित्त हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

स्पर्धेचा मुख्य विषय “भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान” हा असून सहभागी स्पर्धकांनी दिलेल्या चार उपविषयांपैकी कोणत्याही एका विषयावर ३०० ते ५०० शब्दांचा निबंध सादर करायचा आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. आंबेडकरांचे योगदान, सामाजिक न्याय व समतेचा विचार, आधुनिक लोकशाही भारताच्या उभारणीत मसुदा समितीची भूमिका आणि २१ व्या शतकातील घटनात्मक मूल्यांची सुसंगतता हे उपविषय देण्यात आले आहेत.

स्पर्धा मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये खुली असून निबंध सादर करण्याची अंतिम मुदत २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक पारितोषिके व सन्मानपत्र देण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

सहभागींनी निबंध स्पष्ट अक्षरात लिहून किंवा टाईप करून PDF स्वरूपात ई-मेल किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवायचा आहे. निबंधासोबत पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता तसेच विद्यालय, महाविद्यालय किंवा संस्थेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी priyadarshieducationsolutions@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच मुंबई विभागासाठी विलास पवार (८६९१०९१९७२) आणि प्रा. अतुल रणपिसे (७८८८१०१५०३), तर संभाजीनगर विभागासाठी महादेव डांबरे (९६६५०४७१५३) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

राज्यघटनेच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण आणि घटनात्मक मूल्यांविषयी जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
close