शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी | सुपा (ता. पारनेर)
पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील सुपा परिसरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आता गंभीर स्वरूप धारण करत असून, स्थानिक नागरिकांनी सुपा प्रशासन, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः येथील एका प्रसिद्ध बेकरी परिसरात पूर्वीप्रमाणे दर्जा किंवा गुणवत्ता राहिलेली नसतानाही नव्याने वाढलेल्या ग्राहकांच्या गर्दीमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत आणि त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बेकरीसमोर अनधिकृतरीत्या वाहने उभी केली जातात, रस्त्याच्या कडेला पार्किंगची कोणतीही शिस्त पाळली जात नाही आणि मोठ्या प्रमाणात चारचाकी, दुचाकी तसेच प्रवासी वाहने रस्त्यावरच थांबवल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते. अनेकवेळा रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि आपत्कालीन सेवांनाही या कोंडीचा फटका बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास वारंवार आणूनही सुपा पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आरटीओ अधिकारी कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहेत? वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, अतिक्रमण हटविणे आणि नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी संबंधित यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
व्यापारी आणि वाहनचालकांमध्येही याबाबत तीव्र नाराजी असून, महामार्गावर अशा प्रकारे वाहतूक कोंडी होणे ही सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित बाब आहे, याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. नागरिकांनी इशारा दिला आहे की, येत्या काही दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सुपा प्रशासन, पोलीस अधिकारी आणि परिवहन विभागावर राहील.
सुपा परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आता केवळ स्थानिक त्रासापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो सार्वजनिक सुरक्षितता, प्रशासनाची कार्यक्षमता आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा बनला आहे. आता तरी संबंधित अधिकारी जागे होऊन कठोर कारवाई करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
00000

