*दीप अमावास्येनिमित्त भोसलेवस्ती शाळेत प्रकाशाच्या साधनांचे प्रदर्शन.*
इंदापूर: मॉडेल स्कूल भोसलेवस्ती येथे दीप अमावास्येचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना विविध प्रकाशस्रोतांची माहिती व्हावी, तसेच ‘प्रकाश अंधकार दूर करतो’ हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी प्रकाशाच्या विविध साधनांचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले.
या प्रदर्शनात *कंदील, पणती, चिमणी, समई, मातीचा दिवा, निरांजन, विजेरी, बल्ब, सौर दिवा, इलेक्ट्रिक दिवा, चार्जर,मेणबत्ती* आदी पारंपरिक तसेच आधुनिक प्रकाशसाधने मांडण्यात आली होती. जुन्या काळात वापरली जाणारी प्रकाशाची साधने आणि आधुनिक काळातील विजेवर व सौरऊर्जेवर चालणारी साधने यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आल्याने त्यांच्यामध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली.
शाळेच्या *मुख्याध्यापिका आशा नष्टे* यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकाशसाधनांची माहिती देत त्यांचा वापर, महत्त्व आणि काळानुसार झालेला बदल समजावून सांगितला. *दीप अमावास्येच्या माध्यमातून केवळ दिवे लावणे नव्हे, तर अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात पोहोचविणे हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.*
या उपक्रमास विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्यक्ष वस्तूंच्या माध्यमातून घेतलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रकाशस्रोतांची माहिती आनंददायी व अनुभवाधारित पद्धतीने मिळाली.

