shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न राहता ज्ञान, संस्कार, शिस्त, जिज्ञासा, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर आपल्या जीवनात मोठे ध्येय साध्य करावे - हनुमंत बनसुडे एल. जी. बनसुडे विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न राहता ज्ञान, संस्कार, शिस्त, जिज्ञासा, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर आपल्या जीवनात मोठे ध्येय साध्य करावे - हनुमंत बनसुडे 

एल. जी. बनसुडे विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
इंदापूर:  “आजचा सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा, तर उद्याचा सुवर्ण इतिहास तुमच्या यशाचा असेल. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि ज्ञानाच्या बळावर आकाशाला गवसणी घालत एल. जी. बनसुडे विद्यालयाचे नाव जगभर उज्ज्वल करा.”विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न राहता ज्ञान, संस्कार, शिस्त, जिज्ञासा, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर आपल्या जीवनात मोठे ध्येय साध्य करावे, असा मोलाचा संदेश संस्थापक गीता शिक्षण प्रसारक मंडळ पळसदेवचे अध्यक्ष  हनुमंत बनसुडे  यांनी 
पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल & ज्युनिअर कॉलेज, पळसदेव येथे विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला. 

तसेच ते पुढे म्हणाले की,शिक्षणातून यशाकडे...
शिक्षण हे केवळ गुण मिळविण्याचे साधन नसून, जीवन घडविण्याची शक्ती आहे.
मोठे स्वप्न पाहा, त्या स्वप्नांसाठी सातत्याने प्रयत्न करा आणि अपयश आले तरी पुन्हा नव्या जोमाने उभे राहा.
ज्ञान, जिद्द, शिस्त आणि परिश्रम हीच यशाची खरी चतुःसूत्री आहे.
प्रत्येक परीक्षा ही केवळ गुणांची नसून, स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी असते.
आज केलेला अभ्यास, आज घेतलेले कष्ट आणि आज मिळवलेले संस्कार हेच उद्याच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करतात.
“थांबू नका, हार मानू नका, शिकत राहा आणि पुढे जात राहा.”
आजचे गुणवंत विद्यार्थी उद्याच्या समाजाचे ज्ञानवंत, कर्तृत्ववान आणि जबाबदार नागरिक बनतील, हा विश्वासच त्यांच्या यशाची खरी प्रेरणा आहे.




ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन या शासनमान्य संस्थेच्या डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (DTSE), मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा, इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच अबॅकस स्पर्धा परीक्षा यामध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष   हनुमंत बनसुडे (नाना) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नंदाताई बनसुडे (नानी), उपाध्यक्ष डॉ. शीतलकुमार शहा, सचिव श्री. सूरज बनसुडे, DTSE तालुका प्रतिनिधी आर्शी इनामदार, ऐश्वर्या बहिरमल, प्राचार्य  संजय इंगोले, मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे, सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मदने, ज्योती मारकड, तेजस्विनी तनपुरे व चैताली लावंड यांनी केले, तर आभार सौ. ज्योती मारकड यांनी मानले.

----------------------------------------
 DTSE परीक्षेत २६ विद्यार्थी गुणवंत:

डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (DTSE) स्पर्धा परीक्षेत विद्यालयातील एकूण २६ विद्यार्थी गुणवंत ठरले. यामध्ये तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी, प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. या गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण १० हजार रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.
तसेच ISRO अंतराळ भेट निवड परीक्षेत अभिमानास्पद कामगिरी करणारी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. भैरवी प्रितम लावंड हिचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गुणगौरव करण्यात आला. 

भैरवीच्या बंगळुरू येथील अंतराळ संशोधन केंद्राच्या शैक्षणिक भेटीचा संपूर्ण खर्च ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
-------------------------------------
 मंथन सामान्य ज्ञान परीक्षेतही उल्लेखनीय यश:

मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला. या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच केंद्रस्तरावर विद्यालयातील एकूण आठ विद्यार्थी गुणवंत ठरले असून, त्यांनाही प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
----------------------------------
 शिष्यवृत्ती परीक्षेत ३१ विद्यार्थी पात्र: 
शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता चौथीचे १३, इयत्ता पाचवीचे ५, इयत्ता सातवीचे ४ आणि इयत्ता आठवीचे ९ असे एकूण ३१ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरले.
तसेच गोवा येथे झालेल्या अबॅकस स्पर्धा परीक्षेत विद्यालयातील ५ विद्यार्थ्यांनी गुणवंत ठरत उल्लेखनीय यश संपादन केले.
----------------------------------
मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान: 

विद्यार्थ्यांच्या यशामागे अथक परिश्रम, सातत्यपूर्ण मार्गदर्शन व मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सौ. ज्योती मारकड, सौ. तेजस्विनी तनपुरे, सौ. तनुजा फुगे, सौ. चैताली लावंड, सौ. शुभांगी मराडे, सौ. सीमा आदलिंग, सौ. जयश्री लावंड, सौ. सुवर्णा वाघमोडे व सौ. विद्या पोटे या शिक्षकांचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे (नाना) यांच्या हस्ते कौतुक व सत्कार करण्यात आला.
-------------------------------
close