अकोला:-
अकोला जिल्ह्यात आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा हिवताप अधिकारी आणि त्यांचा दलाल 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहेत.
जेव्हापासून प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जिल्हा हिवताप अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे, तेव्हापासून महाराष्ट्रभरात हिवताप विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.विश्वसनीय सूत्रांनुसार, विनंती बदली असो किंवा प्रशासकीय बदली असो, बदलीचे रेट लाख रुपयांच्या वर गेले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती, सेवा पुस्तक, आणि इतर कोणत्याही प्रशासकीय कामासाठी पैशाची मागणी केली जात आहे.
या प्रभारी अधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील हिवताप कार्यालयाला भ्रष्टाचाराचे माहेरघर बनवले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे याच कार्यालयातील काही आरोग्य कर्मचारीच या भ्रष्टाचाराला सहकार्य करत आहेत.
जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचे कानावर येत असूनसुद्धा, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे.हीच आज हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांची खरी व्यथा आहे.
०००

