शिर्डी | प्रतिनिधी
मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज भासत असून जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी कुटुंबे संकटात सापडली असताना यंदाच्या नवरात्रोत्सवात अनावश्यक खर्चाला आळा घालून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन भाजपा प्रांतिक सदस्य नानासाहेब शिंदे यांनी केले आहे.
नवरात्र हा आदिशक्तीची उपासना करण्याचा पवित्र सण आहे. मात्र संकटात सापडलेल्या माणसाच्या मदतीतच उपासनेचे खरे सार्थक आहे. त्यामुळे मंडपाची भव्यता, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई तसेच मोठ्या खर्चाचे सांस्कृतिक कार्यक्रम यावरील खर्च कमी करून धार्मिक विधी साधेपणाने पार पाडावेत. त्यातून वाचणारा निधी दुष्काळग्रस्त कुटुंबांना धान्य, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा किंवा थेट आर्थिक मदत म्हणून देण्यात यावा, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक नवरात्र मंडळांसोबतच घरगुती पातळीवर मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्या नागरिकांनीही यंदा सामाजिक बांधिलकी जपत संयम पाळावा. उत्सवाचा खर्च कमी करून गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी योगदान दिल्यास त्यातून अनेक कुटुंबांना आधार मिळू शकतो, असेही त्यांनी म्हटले.
शासनानेही आदर्श निर्माण करावा
दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता शासन व लोकप्रतिनिधींनीही सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण करावा. शासकीय निधीतून होणारे उत्सव, सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम शक्य असल्यास पुढे ढकलून उपलब्ध निधी दुष्काळी उपाययोजनांकडे वळवावा. टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा छावण्या तसेच रोजगार हमीच्या कामांना गती देण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी नानासाहेब शिंदे यांनी केली.
दुष्काळ हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा प्रश्न नसून तो सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांच्या जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षांनी व सामाजिक संस्थांनी एकत्र येत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिंदे यांच्या या आवाहनाला स्थानिक पातळीवर शेतकरी व नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून, काही नवरात्र मंडळांनी यंदा उत्सव साधेपणाने साजरा करून सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.

