shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लॉन टेनिसमध्ये सूर्या काकडेची राज्यात चमक; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक; सुजाता इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा
सोनई, प्रतिनिधी :मोहन शेगर राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत सुजाता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सोनई येथील इयत्ता बारावीचा विद्यार्थी सूर्या कमलेश काकडे याने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकाविला. या उल्लेखनीय यशाच्या जोरावर त्याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सूर्याच्या या यशामुळे सोनईसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा विभाग, अहिल्यानगर यांच्या संबंधित क्रीडा उपक्रमांतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील गुणवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सूर्याने आपल्या खेळातील कौशल्य, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर लक्षवेधी यश संपादन केले.
स्पर्धेदरम्यान सूर्याने अचूक सर्व्हिस, प्रभावी फटके आणि संयमी खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. प्रसंगानुरूप आक्रमक खेळ करताना त्याने संयमही कायम राखला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविता आला. या यशामुळे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळाली आहे.
सूर्याच्या या यशामागे त्याचा नियमित सराव, खेळाप्रती असलेली निष्ठा, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, क्रीडा शिक्षकांचे सहकार्य आणि पालकांनी दिलेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करता येते, हे सूर्याने आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
या यशाबद्दल सुजाता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच मॉडर्न कॉलेज ऑफ बीसीए, सोनई यांच्या वतीने सूर्याचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण सोनवणे, प्राचार्य ज्योती सोनवणे, शिक्षकवृंद, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी त्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
राष्ट्रीय स्पर्धेतही सूर्या काकडेने उत्कृष्ट कामगिरी करावी आणि आपल्या शाळेसह सोनई व अहिल्यानगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा संस्थेच्या वतीने देण्यात आल्या.
close