shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत सोधा जोमात शेतकरी कोमात...अ‍ॅड. पांडुरंग औताडे

अहिल्यानगर:-
अहिल्यानगर जिल्हा हा सहकार पंढरीचा वारकरी असल्यागत, ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे सहकाराच्या मार्गाने मार्गक्रमण करत आलेला आहे. राजकीय जोड बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी तत्त्वावर चालणारी बँक स्थापन करण्यात आली. यामध्ये अनेकांचे योगदान नाकारता येणार नाही.
मात्र, सहकार क्षेत्रातील सत्ताधारी मंडळींबाबत ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या भाषेत सांगायचे तर, ‘सोयरेधायरे’ आणि ‘एकहाती सत्ता’ हेच समीकरण सध्या दिसते. सहकार क्षेत्रात अनेक तज्ज्ञ मंडळी असतानाही सत्ता ताब्यात ठेवण्याकडे कल आहे. निवडणुका बिनविरोध होण्याकडेही कल राहिला आहे. मात्र, एखाद्या प्रतिनिधीने किंवा संस्थेने सहकार क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य केल्याचे ठोस उदाहरण समोर येते का, हा प्रश्न आहे.

कारखान्यांचे कर्जवाटप २७०० कोटी; शेतकऱ्यांचे कर्ज २४०० कोटी!

जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांशी संबंधित अथवा त्यांच्या प्रभावाखालील १२ साखर कारखान्यांना तब्बल २७०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या कर्जमुक्ती योजनेच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील साधारणतः सव्वादोन लाख शेतकऱ्यांकडे २४०० कोटी रुपयांच्या आसपासyचे थकीत कर्ज होते, जे आता माफ होणार आहे.

म्हणजेच, सव्वादोन लाख शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या एकूण रकमेपेक्षाही १२ साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची रक्कम अधिक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या बँकेच्या कर्जवाटपाच्या धोरणाबाबत त्यामुळे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर कर्ज मिळते. आता काही जण म्हणतील की कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत आणि कारखान्यांना दिलेले कर्जदेखील शेतकऱ्यांसाठीच आहे. हा दावा पूर्णपणे खोटा आहे, असे म्हणता येणार नाही; मात्र, कारखान्यांना दिलेल्या कर्जाचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना किती मिळतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

सहकाराचा मूळ उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. त्यामुळे मोठ्या कर्जदारांना दिलेल्या कर्जाची परतफेड, थकबाकी आणि वसुली यांचा तपशील जनतेसमोर यायला हवा. बँकेच्या कर्जवाटपात शेतकऱ्यांचे हित कितपत जपले जाते, याचे उत्तरही मिळाले पाहिजे.

सहकाराच्या नावाखाली उभी राहिलेली बँक शेतकऱ्यांच्या हितासाठी किती काम करते आणि मोठ्या कर्जदारांना किती आर्थिक आधार देते, हा प्रश्न आज उपस्थित होत आहे. सव्वादोन लाख शेतकऱ्यांच्या २४०० कोटींच्या थकीत कर्जाची चर्चा होत असताना, १२ साखर कारखान्यांच्या २७०० कोटींच्या कर्जाचाही संपूर्ण हिशेब जनतेसमोर यायला हवा.

अ‍ॅड. पांडुरंग औताडे
युवक जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, अहिल्यानगर
close