देवी स्थापना, गरबा नृत्य, धार्मिक कार्यक्रम, पैठणी-साडी गौरव आणि दसरा सिमोल्लंघनाने उत्सवात भर
नगर प्रतिनिधी : (तुषार महाजन)
शिर्डी येथील साई प्रयागा प्रतिष्ठान यांच्या वतीने नवरात्र उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार असून, यासाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मार्गदर्शक मा. श्री. रामभाऊ कोते पा. तसेच संस्थापक-अध्यक्ष मा. श्री. शामभाऊ कोते पा. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. नवरात्र काळात देवीभक्तांसाठी आरती, प्रसाद, गरबा नृत्य, विशेष धार्मिक वाचन तसेच दसरा सिमोल्लंघन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
उत्सवाची सुरुवात रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता देवी स्थापना, घटस्थापना आणि प्रसाद या कार्यक्रमांनी होणार आहे. त्यानंतर सोमवार दि. १२ ऑक्टोबर ते बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता देवीची आरती व प्रसाद, तर रात्री ८.३० वाजता गरबा नृत्य आयोजित करण्यात आले आहे.
गुरुवार दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून सायंकाळी ७ वाजता अध्याय क्र. १४ चे वाचन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजता देवीची आरती व गरबा नृत्य होणार आहे. पुढे शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर, शनिवार दि. १७ ऑक्टोबर, रविवार दि. १८ ऑक्टोबर आणि सोमवार दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजीही दररोज सायंकाळी ७ वाजता देवीची आरती व प्रसाद, तसेच रात्री ८.३० वाजता गरबा नृत्य होणार आहे.
उत्सवाचा समारोप मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दसरा सिमोल्लंघन आणि सोनवाटप या पारंपरिक कार्यक्रमांनी करण्यात येणार आहे. त्यामुळे देवीभक्तांमध्ये या उत्सवाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
या नवरात्र उत्सवात आयोजकांकडून काही विशेष उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार दररोज एका माता-भगिनींना एक पैठणी आणि एका माता-भगिनींना साडी देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच गरबा नृत्यात सहभागी होणाऱ्यांनी टिपऱ्या (दांडिया) स्वतःसोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
देवीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती साई प्रयागा नवरात्र उत्सव महिला समिती व सर्व सदस्य यांच्या वतीने करण्यात आली आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त शिर्डीत भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार असून, हा उत्सव भाविकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.

