shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांचा संताप महावितरणच्या दारात! वीज समस्यांचा पाढा वाचताच अधिकारी अवाक्; पालकमंत्री विखे पाटील यांच्या सूचनेने तक्रार निवारण कॅम्प

अकोले महावितरण कार्यालयात वीज समस्यांचा पाढा

पाणीपुरवठ्याला वीज मिळत नसल्याने नागरिक संतप्त; वाढीव वीजबिले, कमी दाब, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यांसह विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब

अकोले (प्रतिनिधी) : अकोले तालुक्यातील वीज ग्राहक व शेतकऱ्यांच्या विविध वीज समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार अकोले येथील महावितरण कार्यालयात वीज तक्रार निवारण बैठक घेण्यात आली. कार्यकारी अधीक्षक अभियंता श्री. रमेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस आजी-माजी आमदारांसह विविध गावांतील शेतकरी, वीज ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत नागरिकांनी वीज वितरणाच्या कारभारासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. वाढीव वीजबिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अपुऱ्या दाबाने होणारा वीजपुरवठा, वेळेवर वीजबिले न मिळणे, त्यामुळे ग्राहकांना होणारा नाहक भुर्दंड, तसेच अधिकारी व अभियंते कार्यालयात व संबंधित गावांमध्ये उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या.
          पिंपळगाव खांड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उचलण्यासही वीज मिळत नसल्याचा गंभीर प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून केवळ दोन तास वीज मिळत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
          तालुक्यातील देवठाण सबस्टेशनचे काम लवकर पूर्ण करून ते कार्यान्वित करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच अकोले शहरातील रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे पोल नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने शिफ्ट करावेत, अशी मागणी करण्यात आली.
         महावितरणचे अधिकारी व अभियंते कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगितले जाते; मात्र त्याची कार्यालयातील नोंदवहीत नोंद आढळत नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. ज्या अधिकाऱ्यांकडे संबंधित गावांची जबाबदारी आहे, ते त्या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणीसाठी किंवा ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिसत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.
        कळस बुद्रुक येथील दलित वस्तीतील स्ट्रीट लाईटच्या पोलवर विनापरवाना सिंगल फेजच्या पाच तारा टाकण्यात आल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मांडला. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
        बैठकीत नागरिकांनी विविध समस्यांचा अक्षरशः पाढाच वाचल्याने महावितरणचे कार्यकारी अधीक्षक अभियंता श्री. पवार यांच्यासमोर प्रश्नांचा भडिमार झाला. नागरिक व शेतकऱ्यांनी विचारलेल्या गंभीर प्रश्नांची दखल घेत श्री. पवार यांनी प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला तसेच संबंधित समस्या सोडविण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
        दरम्यान, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार वीज तक्रार निवारणासाठी हा कॅम्प आयोजित केल्याबद्दल भाऊसाहेब वाकचौरे व दिलीप कोटकर यांनी पालकमंत्री विखे पाटील यांचे अभिनंदन केले. अधिकारी कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याचा गंभीर आरोप निखिल जगताप यांनी यावेळी केला.
        या बैठकीस माजी आमदार वैभवराव पिचड, आमदार डॉ. किरण लहामटे, कार्यकारी अभियंता रमेश पवार, 
संगमनेर  कार्यकारी अभियंता श्री. सोनवणे,उप कार्यकारी अभियंता,नामदेव शेळके, राजूर उप कार्यकारी अभियंता श्री सोनवणे,अकोले सहाय्यक अभियंता विवेक शिंदे, अकोले शहराचे सहाय्यक अभियंता योगेश गुडगे,भूषण गोगे, भारती मॅडम
      सीताराम भांगरे, सुरेश नवले, भाऊसाहेब वाकचौरे,बाळासाहेब सावंत, दिनेश शहा, शिवाजी पाटोळे, केशव बोडके, नामदेव निसळ, अतुल लोटे, रवी देशमुख, संतोष नवले, विनय वाकचौरे, निखिल जगताप, भाऊ मामा खरात, चक्रधर सदगीर, राहुल देशमुख, अशोक आवारी, सोपान देशमुख, बाळासाहेब भोर, गणेश पापळ, रेश्मा गोडसे, अमोल गोडसे आदींसह आदिवासी भागातील शेतकरी व वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      वीज समस्यांवर केवळ बैठका न घेता प्रत्यक्षात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा उपस्थित शेतकरी व वीज ग्राहकांनी व्यक्त केली.
      यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीजपुरवठा, विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर तसेच विजेसंदर्भातील विविध अडचणी व प्रलंबित प्रश्न मांडले.
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अधीक्षक अभियंता श्री. रमेश पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले.व देवठाण चे सबस्टेशन एक वर्षाच्या आत पूर्ण करून देणार असल्याचे सांगितले.
close