दोन दशकांची समाजसेवा, संघटन कौशल्य आणि ‘वीर वडार एकता फाउंडेशन’च्या माध्यमातून मिळालेले नवे यश
श्रीरामपूर | प्रतिनिधी
वडार समाजाच्या सामाजिक वाटचालीत काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर त्यांच्या कार्यामुळे पदाला प्रतिष्ठा मिळते. अशाच कर्तृत्ववान आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे संपतराव गायकवाड. गेल्या तब्बल वीस वर्षांपासून समाजसेवेचा वसा जपत, वडार समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होत समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.
. संपतराव गायकवाडमाती खोदून,दगड फोडून, मुर्ती बनवून घाम गाळून आणि कष्टाच्या जोरावर पिढ्यान्पिढ्या संसार उभा करणाऱ्या वडार समाजाच्या वाट्याला अनेकदा उपेक्षा, आर्थिक अडचणी आणि सामाजिक संघर्ष आले. अशा परिस्थितीत समाजातील सामान्य माणसाच्या वेदना समजून घेऊन त्याच्या अडचणींसाठी धावून जाणारे कार्यकर्ते समाजासाठी आशेचा किरण ठरतात. संपतराव गायकवाड यांनी याच भावनेतून आपली समाजसेवेची वाटचाल सुरू ठेवली.
दोन दशकांचा निस्वार्थ समाजसेवेचा प्रवास
गेल्या वीस वर्षांत गायकवाड यांनी समाजातील विविध घटकांशी संपर्क ठेवत समाजाचे प्रश्न जाणून घेणे, लोकांना संघटित करणे, अडचणीच्या काळात मदतीचा हात देणे आणि सामाजिक प्रश्नांसाठी आवाज उठवणे, या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांच्या कार्याची खासियत म्हणजे केवळ भाषणांपुरती समाजसेवा न ठेवता प्रत्यक्ष समाजाच्या बांधावर, वस्तीत आणि सामान्य कुटुंबाच्या अडचणीच्या वेळी उभे राहणे. त्यामुळे त्यांच्याबद्दल समाजात विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.
‘वीर वडार एकता फाउंडेशन’च्या माध्यमातून नव्या पर्वाची सुरुवात
समाजसेवेच्या या प्रदीर्घ अनुभवाला आता वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून संघटनात्मक बळ मिळाले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून वडार समाजाच्या विविध प्रश्नांना एकत्रितपणे पुढे नेण्याच्या प्रयत्नांना गती मिळत आहे.
याच कार्याची दखल घेत संपतराव गायकवाड यांची अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, वीस वर्षांच्या सातत्यपूर्ण समाजकार्याला मिळालेली पावती असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे.
निवडीनंतर त्यांना शुभेच्छा देताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनीही, मिळालेल्या पदाचा समाजासाठी योग्य उपयोग करून समाजाचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या खांद्यावर आता अधिक मोठी सामाजिक जबाबदारी आली आहे.
पदापेक्षा समाज मोठा!
संपतराव गायकवाड यांच्या कार्याची खरी ओळख त्यांच्या पदात नसून समाजाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यात आहे. समाजातील तरुणांना संघटित करणे, ज्येष्ठांचा सन्मान राखणे आणि समाजाच्या मूलभूत प्रश्नांसाठी एकत्रित आवाज निर्माण करणे, या दिशेने त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
आज वडार समाजाला शिक्षण, रोजगार, आर्थिक उन्नती, घरकुल, सामाजिक सुरक्षा आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देण्यासाठी संघटित आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची गरज आहे. अशा काळात अनुभवसंपन्न आणि तळागाळाशी जोडलेले नेतृत्व समाजासाठी निश्चितच महत्त्वाचे ठरते.
‘संघर्षातून नेतृत्व, सेवेतून विश्वास’
वीस वर्षांच्या समाजसेवेचा अनुभव, लोकांशी असलेला थेट संपर्क आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड यामुळे संपतराव गायकवाड यांची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
माती खोदणार्या, मुर्ती घडवणार्या, दगड फोडणाऱ्या हातांना सन्मान, कष्टकरी कुटुंबांना आधार आणि पुढच्या पिढीला शिक्षण व प्रगतीची दिशा— या व्यापक उद्दिष्टांसाठी त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी ठरावे, अशी अपेक्षा वडार समाजातून व्यक्त होत आहे.
वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेली नवी जबाबदारी ही त्यांच्या दोन दशकांच्या समाजकार्याची नवी सुरुवात ठरावी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील वडार समाजाच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वातून एकजूट, संघर्ष आणि परिवर्तनाची नवी पहाट उगवावी, हीच सदिच्छा!
“सन्मान पदाचा नाही, तर समाजासाठी झटणाऱ्या कर्तृत्वाचा असतो; संपतराव गायकवाड यांची वीस वर्षांची वाटचाल त्याचेच जिवंत उदाहरण आहे.”
— शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा
सत्य, निर्भीड व जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारी एकमेव वृत्तसेवा

