सातारा प्रतिनिधी:-
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह विशेष प्रतिनिधी यांचेकडून वडार समाजाच्या सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा देणारा, समाजातील युवकांना एकत्र आणणारा आणि विवाह इच्छुक तरुण-तरुणींसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करणारा भव्य युवक व मोफत वधू-वर परिचय मेळावा रविवार दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सातारा येथील धनलक्ष्मी (चेतना) मंगल कार्यालय, गोडोली नाका येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
वडार पँथर संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजहितासाठी सातत्याने पुढाकार घेणारे श्री. दयानंद भाऊ इरकल यांच्या नेतृत्वाखालील मेळाव्याने समाजातील एकजूट, संघटनशक्ती आणि विधायक कार्याचा प्रत्यय घडवून दिला.
या मेळाव्यात १४७ वधू आणि १८० वर अशा एकूण ३२७ विवाह इच्छुकांची नावनोंदणी झाली.
यावेळी वडार समाज वधू वर समस्या निराकरण होण्यासाठी मदत व्हावे यासाठी Vadarvivah. com या वेबसाइटचे मा. ना. श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (बाबाराजे) यांच्या शुभ हस्ते लोकार्पणही करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वडार समाजाच्या या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना ते म्हणाले, महाराष्ट्रभर फिरत असताना वडार समाजाचा अशा स्वरूपाचा भव्य वधू-वर परिचय मेळावा सहसा पाहायला मिळत नाही. या सातारा शहरात होत आहे. याचा आनंद आहे.
यावेळी त्यांनी मिश्कील शैलीत, या मेळाव्याच्या माध्यमातून विवाह निश्चित झाल्यानंतर त्या शुभविवाहासाठी मलाही आवर्जून निमंत्रित करा, असे सांगत उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले.
वडार समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत बोलताना त्यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक आयोजित करून मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे – दयानंद भाऊ इरकल कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना वडार पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद भाऊ इरकल यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.
वडार समाज अनेक वर्षांपासून विविध सोयी-सुविधा आणि हक्कांपासून वंचित राहिला आहे. समाजाच्या प्रगतीसाठी केवळ अपेक्षा व्यक्त करून चालणार नाही, तर सर्वांनी संघटित होऊन प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
दयानंद भाऊ इरकल यांच्या कार्याचा विधायक आदर्श!
समाजकारण म्हणजे केवळ पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी नव्हे, तर समाजातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे होय. याच विचाराला कृतीची जोड देण्याचा प्रयत्न दयानंद भाऊ इरकल यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमातून दिसून आला.
विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी मोफत नावनोंदणी, पालकांसाठी परिचयाचे व्यासपीठ, युवकांचे संघटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विवाहविषयक माहिती उपलब्ध करून देण्याची संकल्पना ही निश्चितच समाजोपयोगी ठरली आहे.
या कार्यक्रमासाठी आयोजक रमेश विटकर, सोमनाथ घोत्रे, भाऊसाहेब पवार, शैलेश बाबा जाधव, प्रमोद पवार आणि श्रीकांत देवकर यांच्यासह वडार पँथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अखिल वडार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुणे अध्यक्ष - हरिष बंडीवडार आणि वडार वधू-वर सूचक महामंडळ, महाराष्ट्र राज्य, पुणे एडमिन - अशोक पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात अनिल अण्णा पवार आणि नारायणराव शिंगाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
समाजाला जोडणारा, नव्या पिढीला दिशा देणारा उपक्रम!
ौशशश..
साताऱ्यात संपन्न झालेला हा मेळावा केवळ वधू-वर परिचयापुरता मर्यादित न राहता सामाजिक ऐक्य, युवकांचे संघटन आणि वडार समाजाच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरला.
दयानंद भाऊ इरकल यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या विधायक प्रयत्नांची व्याप्ती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचावी, समाजातील गरजू कुटुंबांना त्याचा लाभ व्हावा आणि समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना शासनदरबारी न्याय मिळावा, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
जय बजरंग! जय वडार!!
— शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा

