shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीला विजयी करा – वैभवराव पिचड



अकोले येथे ठरावधारक मतदारांच्या बैठकीत आवाहन; शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या विकासावर नेत्यांचा भर

अकोले (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील उमेदवार मा. वैभवराव मधुकरराव पिचड यांनी केले.

अकोले येथे सहकार विकास आघाडीच्या वतीने ठरावधारक मतदारांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यावेळी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, अकोले एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैभवराव पिचड म्हणाले की, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जिल्ह्यातील नेत्यांची इच्छा होती. मात्र, काही कार्यकर्त्यांमुळे या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी सहकार विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

पांडुरंग घुले म्हणाले की, जिल्हा बँक ही शेतकरी आणि सहकारी कारखानदारीसाठी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी जिल्हा बँकेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच मधुकरराव पिचड यांनी पाणी अडविण्यासाठी प्रयत्न केले. सहकार आणि शेतीच्या विकासासाठी जिल्हा बँकेची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

चैताली काळे म्हणाल्या की, मी शेतकऱ्यांची लेक आहे. सहकाराचे बाळकडू मला माहेरी आणि सासरी अशा दोन्ही ठिकाणी मिळाले. मारुतीराव घुले पाटील आणि शंकरराव काळे यांनी जिल्हा बँकेच्या विकासासाठी योगदान दिले आहे. सहकार क्षेत्रातील या कार्याचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन अशोकराव देशमुख, अगस्तीचे संचालक परबतराव नाईकवाडी, पंचायत समितीचे सदस्य दिलीपराव भांगरे आणि ॲड. के. बी. हांडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक यशवंत आभाळे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले, तर जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे यांनी आभार मानले.

या बैठकीला सोसायटी, शेतीपूरक आणि बिगरशेती मतदारसंघांतील ठरावधारक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close