वड,पिंपळ,उंबर !
रक्षिती पर्यावरण !
आंबा जांभूळ, कडुनिंब!,
नेहमीच उपकरी !!
चंदू सांगतसे हो नरनारी!
वृक्ष लावा बहुगूणी !!
मानव, पशूपक्षी, हवापाणी!
सुखदायी पावेल !!
महाकवी: चंद्रकांत शहासने
ही झाडे आपण सरसकट जेव्हा पाहतो तेव्हा जुन्या इमारतींवर कुठेही रूजलेली दिसतात. या वृक्षांचा पसारा ही विस्तीर्ण असतो. आपल्याला यातून एक लक्षात येईल की ज्या ठिकाणी पूर्णतः प्रतिकूलस्थिती आहे अशा ठिकाणी ही झाडे रुजतात, वाढतात. नैसर्गिक हवेतील पाणी शोषण करतात आणि मोठी होऊन जातात . म्हणजेच भरपूर रोगप्रतिकारक शक्ती हा या वृक्षांचा गुणधर्म आहे.
आपल्या पूर्वजांनी या झाडांना देवत्व बहाल केलेले आहे. कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणे हे उत्तम
रोगप्रतिकारक शक्तिचे लक्षण आहे. म्हणून सर्व आजारांवर वडाची पारंबी, वडाची फळे, वडाच्या झाडाखालील माती,उंबराची फळे यांचा वापर केला जातो. पर्यावरण विषय लक्षात घेतला तर एका वडाच्या, पिंपळाच्या, उंबराच्या झाडाखाली अनेक गुरे विश्रांती घेतात. वृक्षावर हजारो पक्षी राहतात, विश्रांती घेतात. झाडाखाली अनेक वाटसरु विश्रांती घेतात. कारण संपूर्ण विश्वाला हे वृक्ष प्राणवायू देत असतात. जगायचं कसं हे शिकवणारे हे वृक्ष आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून उभं राहायला शिका आणि समाजाला जास्तीत जास्त मदत करायला शिका असा हा संदेश हे वृक्ष देतात. पर्यावरण याहून अजुन काही वेगळे असेल असे वाटत नाही. पर्यावरण म्हणजे सृष्टीचे संतुलन. एकमेकाला दिल्या घेतल्याशिवाय आणि निरोगी आरोग्याशिवाय पर्यावरण हे समीकरण सिद्ध होत नाही. म्हणून पर्यावरण रक्षणासाठी वड, आंबा ,जांभूळ, चिंच, पिंपळ अशी बहुउपयोगी झाडे लावणे ही आज काळाची गरज आहे.
मारुती चितमपल्ली हे वनस्पतीशास्त्र तज्ञ असे सांगतात की, बारा तासांहून अधिक काळ प्राणवायूचे उत्सर्जन करणारे वड,पिंपळ,उंबर, कडूनिंब हे भारतीय वंशाचे वृक्ष हे पर्यावरणाचे रक्षक आहेत. हवेचे प्रदुषण रक्षण्यासाठी व पशूपक्षांचा अधीवास वाढविण्यासाठी अशीच झाडे भरपूर लावा.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जूनपासून वन हुतात्मादिन ११सप्टेंबरपर्यंत२०२१ असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान