*इंदापूर ता.२५* : इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे अंतर्गत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त इंदापूरच्या भिमाई आश्रमशाळेत जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन सोमवारी (दि.२५) करण्यात आले होते.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली.
संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे व मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी तथागत गौतम बुद्ध मूर्तीस, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, माता रमाबाई आंबेडकर या बहुजन महामातांच्या प्रतिमांना व इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमांना महिला शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दीप प्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
विविध आश्रमशाळेतून आलेल्या शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
परीक्षेचे परीक्षक म्हणून संदीप गोसावी (तळेगाव ढमढेरे), अश्विनी सोनटक्के (आणे) यांची नियुक्ती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण पुणे यांनी केली होती.
स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील मुखई,तळेगाव ढमढेरे (शिरूर),वाघोली (हवेली),आणे ( जुन्नर),सोनवडी, मोरेवस्ती(दौंड),वाघळवाडी, मुर्टी मोडवे(बारामती) भोसरी(पुणे), इंदापूर आदी आश्रमशाळेतील ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गट क्र.१.इ.५ वी ते ७ वी.रांगोळी विषय : स्वच्छ भारत, स्वातंत्र्य दिन, सर्व शिक्षा अभियान.गट क्र.२.इ.८ वी ते १० वी. विषय: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, हरित वसुंधरा, बेटी बचाव बेटी पढाव.गट क्र.३.इ.११ वी १२ वी. विषय : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महिला सक्षमीकरण, मोबाईलचे व्यसन हे विषय रांगोळी काढण्यासाठी स्पर्धकांना देण्यात आले.स्पर्धेमुळे स्पर्धकांना कलात्मक कौशल्य दाखवण्याची आणि वाढवण्याची संधी मिळाली.
संदीप गोसावी यांनी रांगोळीचे महत्व सांगितले.
जिल्ह्यातून स्पर्धेसाठी आलेल्या स्पर्धक व शिक्षकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
अनिता साळवे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नानासाहेब सानप, हिरालाल चंदनशिवे यांनी केले. आभार साहेबराव पवार यांनी मानले.
संचालक संजय कांबळे, शिल्पकार विक्रम वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण, सूरज धाईंजे तसेच जिल्ह्यातील आश्रमशाळांचे स्पर्धक, शिक्षक उपस्थित होते.