रिझर्व बँकेच्या दंडात्मक कारवाई संदर्भात बँकेकडून त्रुटींची पूर्तता
-इंदापूर बँकेच्या पदाधिकाऱ्यांची माहिती
फोटो - इंदापूर अर्बन बँक इमारत फोटो.
इंदापूर: प्रतिनिधी (दि.२६ जून २१)
भारतीय रिझर्व बँकेकडुन इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर करण्यात आलेली दंडात्मक कारवाई ही रिझर्व बँकेच्या दैनंदिन कामकाजाचा भाग आहे. भारतीय रिझर्व बँकेने एप्रिल २०२१ पासून अशा प्रकारची एकूण २९ बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. इंदापूर अर्बन बँकेने करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाई संदर्भातील त्रुटींची तात्काळ दुरुस्ती करून पूर्तताही केली आहे, अशी माहिती इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष देवराज जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एस.तावरे यांनी शनिवारी (दि. २६) दिली.
राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर अर्बन बँकेचे कामकाज उत्तमरीत्या सुरू आहे. बँकेची प्रगतीकडे वाटचाल चालु आहे. बँकेस सन २०२०-२१या आर्थिक वर्षात करपूर्व नफा रू. ६.५१ कोटी झाला असून निव्वळ नफा रू. ३.०० कोटी झालेला आहे.
रिझर्व बँकेकडुन इंदापूर बँकेच्या दि.३१ मार्च २०१९ अखेरच्या तपासणीत बँकेमधील सॉप्टवेअर मधील त्रुटीमुळे खातेदारांच्या के.वाय.सी. संदर्भात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झालेचे आढळून आले. तसेच दैनंदिन प्रशासकिय कामामध्ये काही त्रुटी दिसून आल्या होत्या. त्यामुळे बँकेकडून सॉप्टवेअर प्रणाली बदलाची प्रक्रिया व के.वाय.सी. संदर्भात पूर्तता करून त्रुटी पुर्णपणे दुर केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
भारतीय रिझर्व बँकेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन हे इंदापूर अर्बन बँकेकडून केले जात आहे. तसेच सन २०२०-२१या वर्षात सभासदांना लाभांश देण्याचा प्रस्ताव रिझर्व बँकेकडे पाठविण्यात आला असून परवानगी मिळताच लाभांश वाटप करण्याचे बँकेचे धोरण आहे. इंदापूर अर्बन बँक गेली दोन दशके चांगल्या पद्धतीने कामकाज करीत असून, तालुक्यातील जनतेच्या दैनंदिन कामकाजाचा बँक एक अविभाज्य घटक बनलेली आहे. हजारो संसार प्रपंच उभारण्यास बँकेने हातभार लावलेला आहे. इंदापूर अर्बन बँक आर्थिकदृष्ट्या भक्कमपणे उभी आहे, असेही उपाध्यक्ष देवराज जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एस. तावरे यांनी नमूद केले.
यावेळी बँकेचे संचालक भरत शहा, रामकृष्ण मोरे, अमरसिंह पाटील, विलासराव माने, अशोक शिंदे, संदीप गुळवे, अँड.विकास देवकर, दादाराम होळ, आदिकुमार गांधी, सत्यशिल पाटील, लालासो सपकळ, भागवत पिसे, अविनाश कोतमिरे, उज्वला गायकवाड, अश्विनी ठोंबरे, उल्हास जाचक, अँड. विजय पांढरे उपस्थित होते.
______________________________

