जसे गवताचे पाते
सांगे धरतीशी नाते
तैसे वेली संगे नाते
मनभरून आणि उरते !! १ !!
गर्द हिरव्या झाडीत
मन सुखावून जाते
उंच इमारती मधी
मन झुरते सुकते !! २ !!
अरे बोकाळली सारी
शहरातील ही वसती
यंत्र होऊनी फिरतो
नाती पयशापूरती !! ३ !!
आता थांब क्षणभरी
जरा मनाला विचारी
काय साधायचे तुला
पैसा असून भिकारी !! ४ !!
चल पान फूल शोधू
चल डोहात हुंदडू
मन पाखरू होऊन
निळ्या आभाळाला भेदू !! ५ !!
आज पर्यावरणाचा समतोल जो ढासळतो आहे त्याची वेदना श्रीपाद कोंडे देशमुख (मो.७९७२७२११०२) यांनी साध्या बाळबोध शब्दात काव्यबद्ध केलेली आहे. तथापी सोप्या शब्दांचा आशय मात्र अत्यंत प्रभावी आणि पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे मनाला होणाऱ्या वेदना जशाच्या तशा मांडण्यास समर्थ ठरलेला दिसून येतो. माणूस चंगळवादाकडे कसा झेपावतो आहे आणि निसर्गाला विसरत रक्ताच्या नात्यापासून दूर जात जात शेवटी मनालाच विचारतो की एवढे वैभव कमवले पण अखेरीस मी भिकारीच आहे.
यातून मनाला शांती मिळवण्यासाठी तो निसर्गाकडे चाललाय आणि बोलतोय ....
चल पानं फूलंशोधू
चल डोहात हुंदडू
मन पाखरू होऊन
निळ्या आभाळाला भेदू..
मोकळ्या आभाळात रमण्यासाठी सुदृढ आणि निसर्गाने परिपूर्ण अशा दूनियेत जाण्याचा मनोदय कवी आपल्या शब्दातून नमूद करतो आणि पर्यावरणाचे महत्व समजावून सांगतो.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जूनपासून वन हुतात्मादिन ११सप्टेंबरपर्यंत२०२१ असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान