शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
भोजडे गावातील युवा कार्यकर्ता श्री.अविनाश मोरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'च्या कोपरगाव तालुका उपाध्यक्ष पदी नुकतीच सार्थ निवड झाल्याबद्दल समस्त भोजडे ग्रामस्थांच्या वतीने नुकतेच सन्मानित करून शुभेच्छा देण्यात आल्या. भोजडे नं.2 विकास सोसायटीच्या प्रांगणात झालेल्या बैठकीत गावातील अनेक तरुण बांधव उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर आणि सरपंच सुधाकर वादे यांनी एकत्र येऊन तरुणांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून यापुढे तरुण सहकाऱ्यांनी समाजकारणात पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पुढील काळात नव तरुणांना मोठी संधी असून आपल्या शिक्षण आणि रोजगाराबरोबरच सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी जागरूक राहण्याबाबत मार्गदर्शन केले.
गावातील तरुण भरकटु नये, त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावेत आणि सर्व जातीधर्मातील तरुणांना सामाजिक प्रवाहात सामील करून घेतले जावे या उदात्त हेतूने भोजडे गावाची वाटचाल सुरु असून यात सर्व ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभत आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने तरुण वर्ग जागरूक असावा आणि त्या माध्यमातून गावातील सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न सुटले जावेत, या निःस्वार्थ भावनेने अविनाश'ने सुरु केलेली वाटचाल समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी असून नुकतीच त्याची तालुका पातळीवर झालेली निवड भोजडे गावासाठी भूषणावह असल्याचे मत सरपंच सुधाकर वादे यांनी व्यक्त केले.
यापुढेही अविनाश'सारख्या सुशिक्षित तरुणांनी मागे न राहता समाजकारणात पुढे होऊन आपले योगदान देणे अपेक्षित आहे. कुठलेही दूषित राजकारण न करता सामाजिक प्रश्न सोडविण्याची भावना असल्यास कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊन आपल्या समाजाला न्याय देता येतो. त्यातूनच खऱ्या अर्थाने प्रत्येक समाजाची आणि गावाची प्रगती साधली जाते, असे मत संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी व्यक्त केले.
यावेळी अविनाश मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठा तरुण वर्ग जमा झाला होता. यात संस्थेचे व्हा. चेअरमन दिनकर बा. सिनगर, संचालक शंकर सिनगर, वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेचे गणेश वाळुंज सह ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख, संतोष सिनगर, गणेश घनघाव, योगेश सोमासे, आदिनाथ सिनगर, विशाल पवार, करण पवार, जमीर शेख, अरबाज शेख, दत्तू सिनगर, समाधान पवार, अलीम शेख, राहुल घनघाव, सचिन घनघाव, अजिनाथ जेऊघाले आदी उपस्थित होते. यावेळी भोजडे नं.2 विकास सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, भोजडे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि गावातील अनेक जेष्ठ ग्रामस्थांनी मोरे यांना शुभेच्छा दिल्यात.
स्वागत शंकर सिनगर यांनी तर गणेश वाळुंज यांनी आभार मानले.

