बी.आर.चेडे - शिरसगांव
कालवा सल्लगार समितीने तातडीने बैठक घेऊन भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. सरासरी पर्जन्यमानापेक्षा ७० टक्के पाऊस कमी झाल्याने भंडारदरा कार्यक्षेत्रातील विहीर व बोअरवेल ला खूप कमी पाणी उपलब्ध असून शेतात उभी असलेली ऊस, घास,भाजीपाला,आदी चारा पिके पाण्याअभावी धरणात पाणी असून देखील जळून चालले आहेत.याबाबत कालवा सल्लागार समितीने ५ नोव्हेंबर रोजी रब्बीचे आवर्तन सुरू करणे गरजेचे आहे.
याचबरोबर धरण कार्यक्षेत्रातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. शासनाकडून सातत्याने शहरी भागाचे नगरपालिकेचे सार्वजनिक पिण्याचे तळे भरून दिले जातात. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचे सार्वजनिक पाणीपुरवठ्याची तळे याबाबत कुठलीही दखल घेतली जात नाही.तरी जलसंपदा विभागाने तातडीने शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडणे गरजेचे आहे.आज रोजी जायकवाडीला पाणी सोडणे गरजेचे नसून सदर पाणी फक्त राजकीय हेतूने सोडले जात आहे. जायकवाडी जवळपास शंभर टीएमसी चे धरण असून सदर धरणावर दोन लाख हेक्टर शेती सिंचन अवलंबन आहे म्हणजेच दोन हजार हेक्टर साठी एक टीएमसी पाण्याचा वापर होतोआज रोजी ५०% पाणीसाठा वापरण्यायोग्य आहे म्हणजेच एक टी एम सी पाणी चार हजार हेक्टरला वापरता येऊ शकते. तसेच भंडारदरा ११ टीएमसी चे धरण असून सदर धरणावर ६५ हजार हेक्टर सिंचन होते, निळवंडे धरण साडे साडेआठ टीएमसीचे असून सदर धरणावरही नियोजित ६२ हजार हेक्टर सिंचन आहे.म्हणजेच भंडारदरा व निळवंडे धरणाचे एक टीएमसी पाण्यामध्ये जवळपास सहा हजार हेक्टर सिंचन होते.त्याचबरोबर मुळा धरण २६ टी एम सी चे असून सदर धरणावर एक लाख ८५ हजार क्षेत्र सिंचनासाठी आहे. म्हणजेच मुळा धरणाचाही पाणी वापर हा एका टी एम सी ला सात हजार हेक्टरक्षेत्र सिंचनासाठी होतो.याच प्रमाणात नाशिक जिल्ह्यातील धरणांचा ही पाणी वापर होत आहे.एकूणच नगर व नाशिक जिल्ह्यातील एक आवर्तन बरोबर जायकवाडीचे तीन आवर्तने होतात हे समन्यायी पाणी वाटप कसे होऊ शकते?यावरून राज्य शासनामध्ये असलेली लोकप्रतिनिधी यांना शेती क्षेत्रापेक्षा औरंगाबाद येथील औद्योगीकरणाला पाणी देण्याचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या गोंडस नावाखाली उद्देश दिसून येत आहे.गंगापूरचे आमदार प्रशांत बमजी हे सातत्याने जायकवाडीसाठी आग्रही असतात परंतु त्यांचा मतदारसंघ हा गंगापूर असून सदर मतदारसंघात शेतीसाठी वैजापूर एक्सप्रेस कॅनॉल पाणी येते. दारणा -गंगापूर धरणाचे पाणी जायकवाडी धरणात सोडल्यास गंगापूर तालुक्यातील शेतीला ते पाणी कसे मिळते हाही प्रश्न निर्माण होत आहे.तसेच वेळोवेळी तुटीच्या काळात जायकवाडी धरणातील मृत जलसाठ्याचा वापर २०१५ व २०१९ ला झालेला असून १५ टीएमसी पाणी मृतसाठ्यातील वापरले आहे. या पाण्याचेही ऑडिट होणे गरजेचे आहे. वरील सर्व बाबीचा विचार करता नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणाचे पाणी सोडणे गरजेचे नसून ते सोडू नये. आज रोजी राज्य शासनाने साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून तो शेती क्षेत्राच्या दृष्टीने अव्यवहार्य आहे.तरी नाशिक व नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत विधानसभेत विरोध करून जिल्ह्यातील शेती उध्वस्त होण्या पासून वाचवावी. दुष्काळी परिस्थितीत औद्योगीकरणाच्या पाण्यामध्ये कपात करावी असे अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

