shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मिशन -७५ उपक्रमांतर्गत सर्वाधिक मतदानासाठी "सन्मान लोकशाहीचे" पुरस्कार; जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना आवाहन पत्र


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
अहमदनगर- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही बळकट करण्यासाठी  प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मतदारांना उद्देशून लिहिलेल्या लोकशाहीचा उत्सव-अहमदनगर जिल्हा मिशन ७५ या संकल्पनेच्या पत्रात केले आहे.

            भारताने नुकताच स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा अमृत महोत्सव साजरा केला.आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा व भारतीय स्वातंत्र्याचा अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे. म्हणून येत्या १३ मे २०२४ रोजी होणाऱ्या अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करणाऱ्या गाव  ,शहर , उद्योग, कंपन्या  , महाविद्यालयाचे युवा मतदार तसेच हाऊसिंग सोसायटी यांच्यासाठी "सन्मान लोकशाहीचे  " पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयाचे वतीने प्रदान केले जाणार आहेत.

            ७५ % पेक्षा अधिक मतदान करणाऱ्या गावांचा  "लोकशाहीचे शिलेदार "हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.उद्योजकीय क्षेत्रामधील कंपन्यांच्या १०० % मतदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांना " सुपर वोटर अवॉर्ड" दिला जाणार आहे. युवा नवमतदारांच्या १०० % मतदानासाठी महाविद्यालयांना  "युवाभारती" पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.हाऊसिंग सोसायटयांना १००% मतदानासाठी  " लोकशाहीचे शिल्पकार "हा मानाचा सन्मान प्रदान केला जाणार आहे.

            भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी , सावलीसाठी मंडप व्यवस्था ,वृद्धांना मदतीसाठी स्वयंसेवक ,मतदार मदत कक्ष , दिव्यांगांसाठी रॅम्प , शौचालय आवश्यक तेथे आदी सेवा पुरवण्याचे नियोजन आहे.यातून सकारात्मकता वाढीस लागून मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार आहे.जगातील सर्वात सक्षम लोकशाही असलेल्या भारताच्या चुनाव का पर्व देश का गर्वया निवडणुकांच्या उत्सवात प्रत्येकाने हिरीरीने सहभागी व्हावे व स्वतःला व समाजाला अभिमान वाटेल असे मतदान करून जिल्हा राज्यात.. देशात अग्रेसर बनवायचा आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले.
            सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून आपापल्या आस्थापनातील एकूण मतदार  व १३ मे २०२४ रोजी मतदान केलेले मतदार व ७५टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेले आहे  ,असा अहवाल महाविद्यालयांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे ,हाउसिंग सोसायटीच्या प्रतिनिधींनी जिल्हा उप निबंधक- सहकारी संस्था यांच्याकडे , उद्योजक व कामगार यांच्या प्रतिनिधींनी सहाय्यक  कामगार आयुक्त यांच्याकडे,एमआयडीसी मधील कंपन्यांनी उपअभियंता- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे,गाव प्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे १७ मे २०२४ पर्यंत सादर करावा.
तरी जास्तीत जास्त गावे,शहर, आस्थापने, कंपन्या,महाविद्यालये तसेच विविध संस्था ,कामगार संघटना यांनी मतदानामध्ये शंभर टक्के सक्रिय सहभाग घेऊन मिशन-७५ ही लोकशाहीच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची संकल्पना यशस्वी करावी असे आवाहन  राहुल पाटील (उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी ), अशोक कडूस  (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी) , मीना शिवगुंडे(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), आकाश दरेकर (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), प्रदीप पाटील (तहसीलदार-निवडणूक), बाळासाहेब बुगे (उपशिक्षणाधिकारी), डॉ . अमोल बागुल( जिल्हा मतदार दूत ) प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार)व सर्व स्वीप समिती सदस्य आदींनी केले आहे .
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close