shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सदैव विद्यार्थीहित पाहणारा प्राध्यापक डॉ. विलास महाले


३० नोव्हेंबर - सेवानिवृत्तीच्या निमित्ताने)

मैत्रीच्या दुनियतेला एक राजा माणूस, कायम विद्यार्थीहित पाहणारा प्राध्यापक आणि सहृदयी मित्र आणि अशी ओळख असलेले माझे परममित्र प्रा. डॉ. विलास महाले सर आज  दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या नियत वयोमानानुसार रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे उरण (रायगड) येथून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा !

शहरात जन्मलेली माणसं शहराइतकीच मनाने मोठी आणि अंतःकरणाने दिलदार असतात याचा प्रत्यय मला महाले सरांच्या रूपाने आला. उरणच्या फुंडे महाविद्यालयात त्यांनी उपप्राचार्य व ग्रामीण विकास या विषयाचे विभागप्रमुख म्हणून आपली जबाबदारी अतिशय यशस्वीपणे व प्रामाणिकपणे पार पाडली आहे. महाले सरांच्याबरोबर दहा वर्ष एक सहकारी म्हणून काम करण्याचा योग आला. एक प्राध्यापक म्हणून, एक सहकारी म्हणून, एक मित्र म्हणून त्यांचा स्वभाव नेहमीच दिलदार राहिला आहे.
सहा फूट दोन इंच उंची लाभलेले हे व्यक्तिमत्व कायम हसतमुख असे.  आनंदीवृत्ती आणि सदैव सहकार्याची भूमिका हे त्यांचे लोभस गुण आम्हा सर्व सहकाऱ्यांना आजही तितकेच भावतात. कॉलेजमध्ये सर्वात अगोदर येणारा प्राध्यापक म्हणजे महाले सर. कॉलेजच्या स्थापनेपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना एकाच कॉलेजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अशी संधी अनेकांना लाभत नाही. पण महाले सरांना ती   लाभली आणि त्यांनी या संधीचे सोनं केलं.आपल्या संपूर्ण ३५ वर्षांच्या सेवेत त्यांनी अध्यापनाचे व संशोधनाचे काम एक कर्तव्यदक्ष प्राध्यापक म्हणून आनंदाने केलेच. पण त्याहीपेक्षा संपूर्ण महालण विभागात त्यांची जिमखानाप्रमुख म्हणून असलेली ओळख फार मोठी आणि सन्मानाची आहे. कॉलेजच्या स्थापनेपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी जिमखानाप्रमुख ही जबाबदारी अतिशय अभिमानाने सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी, खोखो, मॅरेथॉन, ॲथेलेटिक्स, कराटे, फूटबॉल अशा विविध क्रीडा प्रकारात १२५ हून अधिक सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व राज्य स्तरावर प्राप्त केली आहेत. राष्ट्रीय व राज्यस्तरावर क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवलेली अनेक मुले आज रेल्वे पोलिस व लष्करी सेवेत नोकरीला आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात नेहमीच वीर वाजेकर महाविद्यालयाचा दबदबा व नावलौकिक त्यांनी खेळाच्या माध्यमातून वाढवलेला आहे.
महाले सर विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन ठेवून त्यांनी काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे व कल्याणाचे निर्णय त्यांनी कायम घेतले आहेत. कधी कधी गरज भासल्यास पदरमोड करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरही सरांनी अनेक वर्ष काम केले आहे. तसेच अनेक पुस्तकांचे लेखन व संपादनही केले आहे. आज रायगड विभागातला अख्खा महालण विभाग त्यांना ओळखतो आहे. त्यांनी शिकवलेल्या पहिल्या बॅचच्या मुलांमुलींची मुले आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रॅज्युवेट करतात. याचा त्यांना भारी आनंद वाटतो.
शेवरीसारखा उंच असलेला हा माणूस शेवरीसारखाच सरळ आहे. मनाने निर्मळ आणि प्रेमळ आहे. मैत्रीचा बंध जोपासणारी आणि ती अतुट ठेवणारी त्यांची वृत्ती कायम मनाला भावते. कायम आनंदीस्वभाव असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ना कधी ताण दिसतो ना कधी तणाव दिसतो. आमच्यासारख्या नव्या पिढीतल्या तरूणांना ते नेहमी धीर आणि आधार द्यायचे. कितीही आर्थिक मदत लागली तर त्यांचा हात नेहमी पुढे असायचा. कायम शहरी पोशाखात आणि रूबाबात राहणारा हा प्राध्यापक मित्र सर्वांच्या सुखदुःखात, कार्यक्रमात व समारंभात त्याच जाणिवेने सहभागी होत असे. जाणिवेची खोल जाणीव असलेला हा प्राध्यापक मित्र अजातशत्रू आहे.

महाले सर आपल्या कामाशी नेहमी प्रामाणिक असत. जे योग्य, नैतिक आहे त्यांच्या सोबत ते असत. अतिरेकी, अन्यायीवृत्ती त्यांना आवडत नसे. पण एखाद्याचा उपमर्द करून ते कधीच कोणाला बोलत नसत. म्हणूनच ते एक प्राध्यापक म्हणून, माणूस म्हणून दिलदार आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक विनोदाची किनारही आहे. एकमेकांच्यावर कोट्या करण्यात ते माहेर आहेत. पण ते तेवढ्यापुरतेच. मधल्या ब्रेकमध्ये चहाच्या वेळेस ते हमखास कोणावर तरी कोटी करायचे आणि मग आम्ही सगळेजण त्या हास्यरसात बुडून जायचो. मागील दहा वर्षातले असे अनेक प्रसंग आज डोळ्यासमोर उभे राहतात आणि मनाला स्तब्ध करून जातात.

महाले सर एक मित्र म्हणून माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे राहिले आहेत. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेमुळे मला रायगड विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच महाले सरांसारखे अनेक चांगले मित्र जोडता आले. महाले सरांच्या बरोबरच्या अनेक आठवणी आहेत. त्यातील काही ठळक सांगता येतील. माझ्या लग्नाच्या वेळेस सूट घेताना, टु व्हीलर गाडी घेताना ते प्रत्यक्ष माझ्या सोबत होते. त्यांच्या ओळखीमुळे गाडी घेताना माझी खूप आर्थिक बचत झाली आहे. कॉलेजची सहल घेऊन ते कुठेही गेले तर माझ्या मुलीला ते हमखास खाऊ घेऊन येत असे.२०२१ साली मी वाशी कॉलेजला आल्यानंतर त्यांची रोज होणारी भेट थांबली पण मैत्रीत आमच्या खंड पडला नाही. कधी फोनवरून तर कधी प्रत्यक्ष भेटून आजही त्यांच्या बरोबर मैत्रीचा बंध अतुट आहे. तो असाच पुढे दीर्घकाळ राहावा ही आशा. 

असा हा दिलदार मनाचा एक प्राध्यापक मित्र आज आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे. महाले सरांच्या पुढील आनंददायी वाटचालीसाठी मी अंतःकरणापासून त्यांना शुभेच्छा देतो. आपणांस चांगले आरोग्य लाभो, आपल्या अपूर्ण राहिलेल्या अनेक इच्छा, आकांक्षा पूर्ण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

*डॉ.आबासाहेब सरवदे
कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज
वाशी,नवी मुंबई
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
close