*घ्या समजून राजे हो...
*मी पुन्हा आलोय...
*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: २३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले. तेव्हापासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांनाच उत्कंठा होती. मात्र राजकीय सारीपटावरचे डावपेच खेळणे सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री कोण हे ठरण्यास प्रचंड उशीर होत होता. आज तब्बल ११ दिवसांनी ही उत्कंठा संपवून मुख्यमंत्री कोण याची घोषणा झाली आहे. सर्वात जास्त जागा या भारतीय जनता पक्षाने घेतल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार हे उघड गुपित होते. आज सकाळी ११ वाजता केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांची बैठक झाली. आणि त्यात देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांची भाजपचा गटनेता म्हणून एकमुखाने निवड करण्यात आली. हा लेख लिहीत असताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आणि अजित पवार हे महायुतीचे तीन प्रमुख नेते एकत्रितपणे जाऊन राजभवनावर राज्यपालांना सत्ता स्थापनेचे पत्र देऊन आलेले आहेत. आणि राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेचे आमंत्रण देखील दिलेले आहे. त्यानंतर एका पत्रपरिषदेत देवेंद्र फडणवीसांनी मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारं असल्याची घोषणा देखील केली आहे.उद्या संध्याकाळी ५.३० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ ग्रहण करणार आहेत. त्यामुळे हे एक उत्कंठा नाट्य आता संपुष्टात आलेले आहे.
इथे एक बाब नमूद करावीशी वाटते. जुलै २०१९ मध्ये विधानसभा अधिवेशनात आपल्या शेवटल्या दिवशीच्या भाषणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी पुन्हा येईन" अशी घोषणा केली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती करून लढले होते. या युतीत भाजपला १०५ जागा तर शिवसेनेला ६१ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजप शिवसेना युतीचे सरकार येऊ शकत होते. मात्र ऐनवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत अमित शहा यांनी न दिलेल्या वचनाचा मुद्दा पुढे करत युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी अभद्र युती केली. परिणामी "मी पुन्हा येईल" म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना अडीच वर्ष विरोधी पक्षनेता आणि उर्वरित अडीच वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळावा लागला होता. उद्धवपंत दाद देत नाहीत हे पाहून २३ नोव्हेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांशी हात मिळवणी करत सरकार बनवले होते. मात्र ते अवघे अडीच दिवसच टिकले होते. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्रीपदापासून दूरच राहिले होते. मात्र तब्बल पाच वर्षांनी त्यांनी आपला "मी पुन्हा येईल" हा दावा खरा करून दाखवला आहे.
दरम्यान गत पाच वर्षात फडणवीसांच्या "मी पुन्हा येईन" या घोषणेची विरोधकांकडून विशेषतः शिवसैनिकांकडून टिंगल टवाळीही केली गेली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत शांतपणे ची टिंगल टवाळी दुर्लक्षित केली. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी "मी पुन्हा येईल" ही घोषणा खरी करून दाखवली आहे. उद्या ते एका दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे जवळ जवळ ५४ वर्षाचे एक परीपक्व नेतृत्व, त्यांचे वडील स्व. गंगाधरराव फडणवीसही देखील एक राजकारणीच होते. गंगाधरराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि जुन्या जनसंघाचे कार्यकर्ते, ते १९६९ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर १९७५ साली ते नागपूर नगरीचे उपमहापौर बनले. तर १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेत पदवीधर मतदार संघाचे सदस्य बनले. १९८८ साली कर्करोगामुळे त्यांचे अकाली निधन झाले. तेव्हा देवेंद्र फडणवीस अवघ्या अठरा वर्षाचे होते. त्यावेळी ते नागपूर विद्यापीठात लॉ चे विद्यार्थी होते.
देवेंद्रजी हेदेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकच आहेत. लॉ चा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांचा संघाचा प्रचारक म्हणून जाण्याचा इरादा होता. मात्र संघाने भाजपच्या कामात सक्रिय व्हायला सांगितल्यामुळे लॉ चे विद्यार्थी असतानाच त्यांनी नागपूर महापालिकेची निवडणूक लढवली. आणि ते जिंकलेही. १९९२ साली नगरसेवक असतानाच त्यांनी लॉ ची अंतिम परीक्षा दिली, आणि सुवर्णपदकही मिळवले.
महापालिकेत आपल्या कर्तृत्वाचा प्रभाव दाखवल्यामुळे १९९७ साली ते पुन्हा एकदा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्याच वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर म्हणून निवडून आले. तेव्हा त्यांचे वय जेमतेम २७ वर्षाचे होते. महापालिकेचे ते सर्वात तरुण महापौर म्हणून आजही इतिहासात नोंदले गेलेले आहे. एक वर्ष महापौरपदाची कारकीर्द पूर्ण झाल्यावर नागपूर महापालिकेत मेयर इन कौन्सिल लागू झाली.
त्यावेळी ते पुन्हा एकदा महापौर म्हणून निवडून आले.
१९९९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यावेळी भाजपने त्यांना पश्चिम नागपूर मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी सूचना केली. देवेंद्रजी निवडणूक लढले आणि विजयी झाले. आमदारकीच्या पहिल्याच फेरीत त्यांनी उत्कृष्ट संसद पटू चा पुरस्कारही मिळवला.
विधानसभेत जसे देवेंद्रजी सक्रिय होते तसेच पक्ष संघटनेतही सक्रिय होते. त्या काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे ते राष्ट्रीय पदाधिकारी होते. नंतर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणूनही कार्यरत झाले होते.
२००९ मध्ये नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर सुधीर मुनगंटीवार भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले. २०१२ मध्ये मुनगंटीवारांचा कालखंड संपल्यावर २०१३ मध्ये तरुण देवेंद्रजींना पक्षाने भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बनवले. लगेचच २०१४ च्या लोकसभा निवडणुका आल्या. देवेंद्रजींनी आपले कुशल संघटन कौशल्य वापरून त्या निवडणुका लढवल्या. परिणामी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला ४८ पैकी ४२ जागा जिंकता आल्या. पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकाही आल्या. १९८८ पासून भाजप शिवसेना युती होती. या युतीत शिवसेना विधानसभेच्या जास्त जागा लढवत असे, तर भाजप कमी जागांवर लढायचा. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात जे घवघवीत यश मिळाले होते, त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी पुन्हा बोलणी करून जागांची फेरफार करावी आणि भाजपने जास्त जागांवर निवडणूक लढवावी या प्रयत्नात देवेंद्रजी होते. मात्र शिवसेना नेत्यांचे अडेल तट्टू धोरण तिथे आडवे आले. शेवटी शेवटल्या क्षणी भाजप शिवसेना युती तुटली. देवेंद्रजींनी लगेचच हालचाली करून महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवल्या, आणि १२२ जागांवर विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात महाराष्ट्रात भाजपला १०० च्या वर जागा मिळवण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांनी सरकार बनवण्याचा दावा केला
पक्षाने मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच निवडले. भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झाली. नंतर या सरकारला पाठिंबा देत शिवसेना सुद्धा सरकारमध्ये सहभागी झाली. आणि पाच वर्ष सरकार चालवले.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. युतीत दोन्ही पक्ष एकत्र लढले. प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस हे सरकारचे पुढचे मुख्यमंत्री असतील असे सांगितले जात होते. मात्र निवडणुकीचे निकाल लागताच उद्धव ठाकरेंनी सरड्यासारखा रंग बदलला. योगायोगाने भाजपला फक्त १०५ जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला ६१ जागा मिळाल्या होत्या. निकाल जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहा यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता असा पवित्रा घेतला. विशेष म्हणजे हे थेट थेट देवेंद्रजींशी न बोलता पत्र परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी जाहीर केले. प्रत्यक्षात ज्या खोलीत अमित शहा यांनी आपल्याला शब्द दिला असा दावा उद्धवपंत करीत होते त्या खोलीत त्यावेळी उद्धवपंत आणि अमित शहा यांच्याशिवाय कोणीच नव्हते. आपण असा कोणताही शब्द दिला नाही असा दावा अमित शहा हे करत होते. आपण कधीच खोटे बोलत नाही आणि दिलेला शब्द मोडत नाही,अमित शहाच खोटे बोलतात आणि दिलेला शब्द मोडतात, असा आरोप उद्धव ठाकरे करत होते. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेला दिलेली वचने कशी मोडली याचे दाखले महाराष्ट्रातले पत्रकार त्यावेळी देत होते.
शेवटी उद्धवपंत ठाकरेंनी भाजपशी असलेली युती तोडली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत अभद्र आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळवले. विशेष म्हणजे ज्या काँग्रेस पक्षाशी त्यांचे वडील स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर वैर धरले होते आणि जे बाळासाहेब सर्वपक्षीय राष्ट्रीय नेत्यांना मातोश्रीवर यायला भाग पाडत होते, त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून काँग्रेसच्या सोनिया गांधींकडे पाणी भरत होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार बनवल्यामुळे सहाजिकच भाजप विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत बसला. देवेंद्रजी विरोधी पक्षनेते झाले. थोड्याच दिवसात देशात कोरोनाची साथ आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यकारभार चालवत होते. मात्र विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर सर्वत्र फिरत होते आणि कोरोनाग्रस्तांचे अश्रू पुसत होते. या धावपळीत देवेंद्रजींनाही कोरोनाने ग्रासले. मात्र त्याची परवा न करता ते कार्यरत राहिले. या काळात उद्धव ठाकरे हस्तिदंती मनोऱ्यात बसून राज्यकारभार करत होते, तर देवेंद्रजी महाराष्ट्राच्या जनतेच्या समस्यांवर आवाज उठवत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत होते.
विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत असताना राजकीय चातुर्य वापरून देवेंद्रजी विरोधकांवर कुरघोडी करण्याचा कायमच प्रयत्न करत होते. त्याचेच पर्यावरण जून २०२२ मध्ये उद्धव ठाकरे सरकार पाडण्यात झाले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली युती ही त्यांच्याच पक्षातील अनेकांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांच्यातील ४० विधानसभा सदस्य पक्ष सोडून बाहेर निघाले आणि देवेंद्रजींसोबत आले. त्यांचेच नेते असलेले एकनाथ शिंदे यांना देवेंद्रजींनी मुख्यमंत्री बनवले. वस्तूत: त्यावेळी ते स्वतः मुख्यमंत्री बनू शकले असते. मात्र त्यांनी पक्ष हित आधी पाहिले आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवले. ज्यावेळी ही घोषणा त्यांनी केली त्यावेळी आपण सरकारला बाहेरून पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र थोड्याच वेळात पक्षश्रेष्ठींनी त्यांना भाजपसह पक्षात सरकारमध्ये सहभागी व्हायला सांगितले. शिंदे सरकार मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी असा श्रेष्ठींनी आदेश केला. श्रेष्ठींचा आदेश मान्य करत उपमुख्यमंत्री या खालच्या पदावर त्यांनी अडीच वर्ष काम केले आणि सरकारचा कारभार सूचारू रूपाने चालवला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अनपेक्षितरित्या पीछेहाट बघावी लागली. हा देवेंद्रजींकरता धक्का होता. मात्र त्यातून लगेच ते सावरले. पक्षश्रेष्ठींना आपल्याला पक्ष कार्यासाठी सरकारच्या जबाबदारीतून मोकळे करावे अशी त्यांनी विनंतीही केली. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना तशी परवानगी दिली नाही. शेवटी त्यांनी पुन्हा रणनीती आखत विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. यावेळी शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा तिघांची महायुती होती. ही निवडणूक ऐतिहासिक अशीच म्हणता येईल. या निवडणुकीत काँग्रेसने मुस्लिम उलेमा बोर्डाचा पाठिंबा मिळवताना अनेक तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्याचा आधार घेत देवेंद्रजींनी रान उठवले आणि नरेंद्र मोदींचा "एक है तो सेफ है" तसेच योगी आदित्य नाथांचा "बटेंगे तो कटेंगे" हा नारा पुढे करत जनमत जागृत केले. देशात राज्यातील एक विशिष्ट समाज व्होट जिहाद करणार असेल तर आम्हालाही मतांचे धर्मयुद्ध करावे लागेल असा बेधडक नारा देत देवेंद्रजींनी प्रचाराचे रान उठवले. त्यामुळेच महायुतीला घवघवीत यश मिळाले. आज महायुतीसोबत २८८ पैकी २३५ सदस्य आहेत. ही विक्रमी संख्या आहे. यापूर्वी सत्ताधारी आघाडीला सर्वात जास्त जागा २२२ इतक्या १९७२ साली मिळाल्या होत्या. हा रेकॉर्ड मोडत देवेंद्रजींनी एक नवा इतिहास रचला आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सतत तीन वेळा १०० च्या वर जागा मिळवून दिल्या आहेत. यावेळी तर १३२ म्हणजे रेकॉर्ड ब्रेक जागा भाजपला मिळालेल्या आहेत. महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांनाही आजवर त्यांच्या कोणत्याही पक्षाला ८० च्या वर जागा मिळवून देता आल्या नव्हत्या हे विशेष.
१९७८ नंतर महाराष्ट्रात शरद पवार हे राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याशी पंगा घेण्याची हिंमत विरोधी पक्षातीलही कोणी करत नव्हते. मात्र त्यांना अंगावर घेण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. शरद पवारांनी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना अडचणीत आणण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याला फडणवीस पुरून उरले आणि आज विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांनी धूळधाण उडवली आहे. आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दहा जागा मिळाल्या आहेत.
फडणवीसांना ते मुख्यमंत्री होत असतानाच वारंवार अडचणीत आणणारे दुसरे व्यक्तिमत्व हे उद्धव ठाकरे होते. ठाकरेंनीही फडणवीसांचा कायम दुस्वासच केला. मात्र शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच उद्धव ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष फोडत त्यांना विकलांग करण्याचे काम फडणवीस यांनी केले. आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही जेमतेम २० जागा विधानसभेत मिळू शकल्या आहेत. एकूणच आपल्या विरोधकांना पुरते नामोहरम करण्याचे राजकीय कौशल्य फडणवीस यांनी दाखवले आहे हे वास्तव नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे आपल्या राजकीय कारकीर्दीत फडणविसांवर कोणताही डाग नाही. अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे नेते म्हणून ते ओळखले गेले आहेत. दुसरे म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवले आहेत. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे समृद्धी महामार्ग आज हा महामार्ग महाराष्ट्राची शान बदल आहे.
असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले देवेंद्र गंगाधरराव फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. महाराष्ट्रात लागोपाठ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा मान फक्त वसंतराव नाईक यांनाच मिळाला होता.
मात्र दोनदा मुख्यमंत्री बनण्याचा मान वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख अशा सर्व मान्यवरांना मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील त्यातीलच एक आहेत.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी "मी पुन्हा येईल" असा बुलंद आवाज देवेंद्रजींनी जुलै २०१९ मध्ये विधानसभेत उठवला होता. तो बुलंद आवाज खरा करीत आज देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज झाले आहेत. "मी पुन्हा आलोय" अशी महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेला साद घालत देवेंद्रजी महाराष्ट्रात राज्यकारभार चालवण्यासाठी सज्ज झाले आहेत.त्यांना खूप खूप शुभेच्छा.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे....? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो....
्