प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी : -
आरोग्य विभागाने रुग्णांचा जीव वाचवा त्यांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून करोडो रुपये खर्च करून सुरू केलेली 108 रुग्णवाहिकेची आरोग्य सेवा ही नेमकी कशासाठी केली याचा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असून या खाजगी यंत्रणेवर कोणाचे नियंत्रण नाही का असा सवाल जनतेला पडला आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव दि:7/2/25 रोजी केज तालुक्यातील सांगावी पटीजवळ झालेल्या अपघातात पाहायला मिळाला त्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .त्या पैकी एक रुग्ण केज उपजिल्हा रुग्णालयात मयत झाला व उर्वरित 04 रूग्णांना केज उपजिल्हा रुग्णालयात अस्तिरोग तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाई येथे घेऊन जाण्याचा सूचना वैद्यकीय अधिकारी केज यांनी केल्या होत्या .
त्यामुळे रुग्णांना पुढील उपचार करण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता होती त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी 108 रुग्णवाहिकेला कॉल केला पण रुग्णवाहिका लवकर न आल्यामुळे एक रुग्ण गंभीर जखमी असल्यामुळे खाजगी रुग्णवाहिकेने वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाई येथे पाठवण्यात आला. परंतु तो पण रुग्ण रस्त्यातच मयत झाला. उर्वरित राहिलेले चार रुग्ण एक तासापासून उपजिल्हा रुग्णालय केज येथे रुग्णवाहिकेची वाट पाहत बसले होते .त्यानंतर नातेवाईकांनी परत एकदा 108 ला कॉल केल्यानंतर कॉल सेंटर वरून तुम्हाला धारूर ग्रामीण रुग्णालयातून 108 रुग्णवाहिका येत आहे असे सांगण्यात आले .परंतु संबंधित नातेवाईकांनी केज उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी 108 ची रुग्णवाहिका सकाळी सात वाजल्यापासून उभी आहे असे सांगितले .त्यानंतर त्यांनी परत 108 कॉल सेंटरला फोन केला परंतु रुग्णवाहिका उभी असताना सुद्धा ती रुग्ण घेऊन जात आहे , कॉलवर आहे असे केज उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेली 108 ची रुग्णवाहिका दाखवत होती. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर केंद्रे यांना संपर्क केला त्यांनी पण 108 ची रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन जाण्यासाठी येईल असे सांगितले परंतु केज उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेने रुग्णांना एक तास रुग्णालयात ताटकळत ठेवले या प्रकारानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी दिनांक 12.2.2025 रोजी रुग्णवाहिकेची तक्रार वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय केज यांच्याकडे करण्यात आली त्याची चौकशी सुरू आहे.
या प्रकारामुळे बीड जिल्यातील 108 रुग्णवाहिकांची चौकशी करून माहिती घेतली असता धक्कादायक प्रकार समोर आले आहेत जिल्यातील 108 रुग्णवाहिका ह्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत त्यांच्यावर काम करणारे डॉक्टर हे गैरहजर राहतात व फक्त ड्रायव्हर रुग्णांना घेऊन जातात असे प्रकार उघडकीस आल्याचे समजते. त्या प्रकरणात तक्रार करण्यात आली होती अशी माहिती आहे. तसेच रुग्ण वाहिका या उभ्या असताना ऑन कॉल कशा दाखवल्या जातात ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे त्यांना लागू असलेली GPS प्रणाली चालू आहेत की बंद आहेत याची तपासणी कोण करते हे अनुत्तरित आहे .
तसेच शासकीय रुग्णालयातून पुढील उपचारासाठी जाणार रुग्ण हा शासकीय रुग्णवाहिकेतून जातो की खाजगी रुग्णवाहिकेतून जातो हे पण तपासणी करण्याची गरज आहे ही ही जबाबदारी कोणाची आहे? 108 रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर व स्टाफआहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे? शासकीय रुग्णालयातून पुढील उपचारासाठी जाणारे रुग्ण खाजगी रुग्णवाहिकेने पाठवावे की शासकीय रुग्णवाहिका द्यावी ही जबाबदारी कोणाची आहे ? तसेच प्रत्येक रुग्णालयातून 108 रुग्णवाहिकेने किती रुग्ण उपचारासाठी घेऊन जाण्यात आले त्यांची बिले अदा करण्यासाठी कोणाच्या साह्य असतात ते यांच्यावर नियंत्रण करू शकत नाहीत का? या सर्व बाबीची चौकशी होऊन रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा देण्यात याव्यात व संबंधीत यंत्रणेतील सर्व दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाप्रमुख डॉ वासुदेव नेहरकर यांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.आरोग्यमंत्री, मा.पालकमंत्री अजीतदादा पवार,मा.संप्रकमंत्री पंकजाताई मुंडे बीड,आ नमिताताई मुंदडा व आरोग्य उपसंचालक लातूर यांच्याकडे केली आहे.



