गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींसोबत व्हिडिओ व्हायरल होणे भोवले...
सेनगांव/विश्वनाथ देशमुख
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असुन याबाबतचे आदेश हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दि.२१ मार्च शुक्रवार रोजी काढले आहेत.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत बसलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने तसेच कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
सेनगांव येथील एका वाळुमाफीयाच्या रिल्स नुकत्याच सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या होत्या यामध्ये वाळुमाफीया असलेल्या भाऊ राठोड याने समोरील टेबलावर नोटाचे बंडल ठेवून रिल्स तयार करुन समाज माध्यमावर व्हायरल केली होती.यानंतर हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले होते त्यानंतर सदरील व्हिडिओ दोन वर्षापुर्वीचा असल्याचे भाऊ राठोड याने सांगितले होते तसेच यापुढे अवैध वाळु व्यवसाय करणार नाही अशी कबुली ही दिली होती.या व्हायरल झालेल्या रिल्स मध्ये सेनगांव येथे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकासोबत बसलेले दिसुन आले होते.तसेच दि.२ मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तपासाला गेलो होतो त्यावेळी माहिती घेत असताना कोणीतरी व्हिडिओ काढल्याचे स्पष्टीकरण खंदारे यांनी दिले होते. मात्र उपनिरीक्षक खंदारे हे वरिष्ठांची परवानगी न घेता तपास कामी रिसोड येथे गेल्याचे दिसून आले तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत बसलेला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांनी पोलिसांची प्रतिमा मलीन होईल असे कृत्य केले तसेच कर्तव्यात बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आले असुन या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अशी माहिती आज दि.२१ मार्च शुक्रवार रोजी रात्री उशीरा प्राप्त झाली.