अठारावी आयपीएल आता पराकोटीच्या शिगेला पोहोचली आहे. त्यातच प्रत्येक संघ एकमेंकावर कुरघोडी करून वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मंगळवारी दिल्ली कॅपीटल्सने लखनौ सुपर जायंटसला चित करून गुणतालिकेत द्वितीय स्थान मिळविले. केएल राहुल आणि अभिषेक पोरेलच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा आठ विकेट्सनी पराभव केला. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात एडन मार्करामच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौने २० षटकांत ६ गडी गमावून १५९ धावा केल्या, प्रत्युत्तरात दिल्लीने १७.५ षटकांत २ बाद १६१ धावा करत सामना जिंकला. दिल्लीचा आठ सामन्या मधला हा सहावा विजय आहे. दिल्लीने पहिल्या आठ पैकी सहा सामने जिंकण्याची ही मोसमातील पाचवी वेळ आहे.
विद्यमान आयपीएल पूर्वी, दिल्लीने २००९, २०१२, २०२०, आणि २०२१ हंगामात पहिल्या आठपैकी सहा सामने जिंकले होते. विशेष म्हणजे दिल्लीने जेव्हा-जेव्हा ही कामगिरी केली, तेव्हा तेंव्हा प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यश मिळविले आहे. या विजयासह दिल्लीचे १२ गुण झाले असून गुणतालिकेत गुजरात टायटन्सनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. दिल्ली आणि गुजरातचे समान गुण आहेत, परंतु निव्वळ धावगतीच्या आधारावर टायटन्स अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे, लखनौचे नऊ सामन्यांत पाच विजय आणि चार पराभवांसह दहा गुण आहेत आणि ते गुण सारणीत पाचव्या स्थानावर आहे.
यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने आयपीएलमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी डावात अशी कामगिरी करणारा तो फलंदाज ठरला आहे. डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत राहुलने १३० डावांमध्ये ही कामगिरी केली. वॉर्नरने १३५ डावात आयपीएलमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे ज्याने १५७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे, तर एबी डिव्हिलियर्स १६१ आणि शिखर धवन १६८ डावांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला करुण नायरच्या रूपाने झटका बसला जो नऊ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५ धावा काढून बाद झाला. यानंतर राहुल आणि पोरेल यांनी दिल्लीचा डाव पुढे नेत दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. या दरम्यान पोरेलने या मोसमातील पहिले अर्धशतक झळकविले. मात्र, पन्नास धावा केल्यानंतर तो जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि मार्करामने त्याला डेव्हिड मिलरकरवी झेलबाद करून परतीचा रस्ता दाखविला. पोरेलने ३६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५१ धावा केल्या.
पोरेल सोबतची भागीदारी तुटल्यानंतर कर्णधार अक्षर पटेल क्रिजवर आला आणि त्याने राहुलसोबत झकास भागीदारी रचली. राहुल आणि अक्षर यांनी गियर बदलले आणि वेगाने खेळायला सुरुवात केली. राहुलने ४० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर प्रिन्स यादवच्या चेंडूवर षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीसाठी राहुलने ४२ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ५७ धावा केल्या, तर अक्षर पटेल २० चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ३४ धावा करून नाबाद राहिला. राहुल आणि अक्षर यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची नाबाद भागीदारी झाली. लखनौकडून मार्करामने बाद झालेले दोन्ही फलंदाज टिपले. अशाप्रकारे दिल्लीने या मोसमात लखनौविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले.
तत्पूर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण लखनौसाठी एडन मार्कराम आणि मिचेल मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी अप्रतिम भागीदारी केली. ही भागीदारी तुटल्यानंतर लखनौचा डाव गडगडला. लखनौकडून मार्करामने ३३ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ५२ धावा केल्या, तर मार्शने ३६ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४५ धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना मार्श आणि मार्कराम यांनी लखनौला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. मार्करामने आपले अर्धशतक ३० चेंडूत पूर्ण केले, जे त्याचे या मोसमातील चौथे अर्धशतक आहे. मात्र दुष्मंथा चमीराने मार्करामला बाद करून ही भागीदारी तोडली. मार्कराम बाद होताच लखनौचा डाव गडगडला आणि २३ धावांच्या अंतरात त्यांनी चार विकेट गमावल्या. मार्कराम बाद झाल्यानंतर मिचेल स्टार्कने नऊ धावा करून बाद झालेल्या निकोलस पूरनला बाद केले.
त्यानंतर मुकेश कुमारने दोन धावा करणाऱ्या अब्दुल समदला बाद केले. चांगली फलंदाजी करणारा मिचेल मार्शही मुकेश कुमारचा बळी ठरला. त्यानंतर प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या आयुष बडोनीने डेव्हिड मिलरसह पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली मात्र मुकेश कुमारने बडोनीला बाद केले. बडोनी २१ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ३६ धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे लखनौचा डाव संपायला दोन चेंडू बाकी असताना कर्णधार रिषभ पंत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
या सामन्यात पंत केवळ दोन चेंडू खेळला असला तरी त्याला खातेही उघडता आले नाही आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर तो मुकेशच्या गोलंदाजीवर बाद झाला. दिल्लीकडून मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या, तर स्टार्क आणि चमीराला प्रत्येकी एक विकेट मिळाली. या सामन्यात कुलदीप यादवला एकही बळी मिळविता आले नाही. या मोसमात कुलदीप खाली हात राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एकंदर या सत्रात दिल्लीची कामगिरी लक्षवेधक होत असून असाच टेंपो पुढे नेला तर स्वतःचे पहिले आयपीएल विजेतेपद ते मिळवू शकतात, पण हि बाब दिसते तेवढी सोपी नाही, कारण प्रत्येक संघ स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात सरस कामगिरी करत असतो. तेंव्हा दिल्लीला असाच किंवा यापेक्षा नेत्रदिपक खेळ करावा लागेल. तरच आयपीएल चॅम्पियन हे बिरूद त्यांच्या नावे लागेल.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२