shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाविद्यालयाची सातत्याने प्रगती झाल्याने रुग्णसेवेत झाले आमूलाग्र बदल : पालकमंत्री गुलाबराव पाटील

महाविद्यालयाची सातत्याने प्रगती झाल्याने रुग्णसेवेत झाले आमूलाग्र बदल : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात "थ्री टी एमआरआय मशीन" चे उद्घाटन, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती.
महाविद्यालयाची सातत्याने प्रगती झाल्याने रुग्णसेवेत झाले आमूलाग्र बदल : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या ८ वर्षात जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सातत्याने प्रगती करून रुग्णसेवेमध्ये आमूलाग्र बदल केले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील महाविद्यालयामध्ये रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक अशा सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे. एमआरआय तपासणी करण्याची सुविधा ही देखील त्यातीलच एक भाग असून यामुळे रेडिओलॉजी विभागाला महत्त्वाचे यश मिळाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे रुग्णांच्या सुविधेसाठी "थ्री टी एमआरआय मशीन" या अत्याधुनिक उपकरणाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. ३ मे रोजी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खा. स्मिताताई वाघ, शहराचे आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता (पदव्युत्तर) तथा रेडिओलॉजी विभागाचे प्रभारी डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता डॉ.रमेश वासनिक (पदवीपूर्व) उपस्थित होते. 

सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये डॉक्टर मारोती पोटे यांनी सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे स्थापनेनंतर गेल्या ८ वर्षांमध्ये अल्पावधीतच क्ष किरण विभागांमध्ये आता सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन यासोबत थ्री टेस्ला एमआरआय मशीनची देखील अत्यावश्यक सुविधा रुग्णांना उपलब्ध झाली आहे. सुरुवातीला केवळ रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा सुरू राहील. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने एमआरआयची सुविधा ओपीडी तत्त्वावर रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येईल, असेही डॉ. पोटे यांनी सांगितले. यानंतर केंद्र आणि राज्य पुरस्कृत ईडब्लूएस योजनेअंतर्गत २०२३-२४ ला मंजूर निधीतून थ्री टेसला एमआरआय मशीन या अत्याधुनिक उपकरणाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांचे कौतुक करून अद्ययावत रुग्णसेवेचे कौतुक केले. तर आ. राजूमामा भोळे, खा. स्मिता वाघ यांनीहि त्यांच्या मनोगतातून, रुग्णसेवेत जळगाव आता भरारी घेत असून उच्च सुविधा मिळत असल्याने रुग्णांना फायदा होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. तर अध्यक्षस्थानावरुन बोलताना ना. गिरीश महाजन म्हणाले की, मेडिकल कॉलेज स्थापन झाल्यापासून जिल्ह्यातील रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. आता रुग्णांना एमआरआयची अल्पदरात सुविधा मिळणार असल्यामुळे आर्थिक झळ पोचणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांनी वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांचा लाभ घ्यावा असेही ना. गिरीश महाजन यांनी सांगितले. 

यावेळी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रमोहन हरणे, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. संजय चौधरी, मुख्य अधिसेविका जयश्री जोगी यांचेसह विविध विभागप्रमुख, डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश बारी यांनी केले. आभार अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी मानले.

close