मागील दोन महिने सुरू असलेली आयपीएल अंतिम टप्प्यात आली असतानाच भारत - पाक तणावमुळे स्थगित करावी लागली. मात्र त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जेंव्हा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होईल तेव्हा हे सामने मर्यादित शहारात आयोजित केले जाऊ शकतात. ईएसपीएन क्रिकइन्फो मधील एका वृत्तानुसार, जर आयपीएल २०२५ चा हंगाम एक आठवडा पुढे ढकलल्यानंतर मे महिन्यात पुन्हा सुरू झाला तर त्याचे सामने फक्त तीन शहरांमध्ये आयोजित केले जाऊ शकतात. यासाठी बंगळुरू, चेन्नई आणि हैद्राबाद या शहरांमधे सामने होऊ शकतात.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलचा चालू हंगाम एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आयपीएलचा अठरावा हंगाम अंतिम टप्प्यात होता आणि प्लेऑफ सामन्यांसह १६ सामने खेळायचे बाकी होते. अहवालानुसार, जर भारत सरकारने स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली तर आयपीएल आपले सामने आयोजित करण्यासाठी दक्षिण भारतातील तीन शहरांची निवड होऊ शकते.
तथापि मे महिन्यात स्पर्धा सुरू झाल्यास त्यांचे परदेशी खेळाडू उपलब्ध असतील असा विश्वास फ्रँचायझींना आहे. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी द्विपक्षीय वचनबद्धता पूर्ण करणे देखील महत्त्वाचे आहे. त्याच वेळी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना देखील ११ जूनपासून लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ५७ सामने पूर्ण झाले आहेत, तर धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेलेला ५८ वा सामना मध्येच थांबविण्यात आला आणि नंतर रद्द करण्यात आला.
आयपीएल २०२५ चा हंगाम एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आल्यानंतर बहुतेक परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही लीग एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी, गुरुवारी धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेलेला सामना मध्येच थांबविण्यात आला.
स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यानंतर विविध फ्रँचायझींचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ त्यांच्या घरी परतत आहेत, तर अनेक परदेशी खेळाडूही मायदेशी परतले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एका निवेदनात म्हटले आहे की, 'आमचे खेळाडू आणि कर्मचारी सुरक्षितपणे बंगळुरूला पोहोचले आहेत आणि आता ते आपापल्या शहरांमध्ये आणि देशांमध्ये परतत आहेत.' बीसीसीआय, स्थानिक अधिकारी आणि पोलिसांच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
आरसीबीच्या परदेशी खेळाडूंमध्ये टिम डेव्हिड, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, रोमारियो शेफर्ड, फिल साल्ट, जोश हेझलवूड, लुंगी एनगिडी आणि नुवान तुषारा यांचा समावेश आहे. परदेशी सपोर्ट स्टाफमध्ये मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर, गोलंदाजी प्रशिक्षक अॅडम ग्रिफिथ, क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक मो बोबॅट, संघाचे फिजिओ इव्हान स्पीचली आणि तज्ञ फ्रेडी वाइल्ड यांचा समावेश आहे.
लखनौ सुपर जायंट्सच्या एका अधिकाऱ्यानेही पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांचे काही परदेशी खेळाडू शनिवारी परतले आहेत तर काहींनी काही काळासाठी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आपापल्या ठिकाणी गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केकेआरचे खेळाडू शनिवारी सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध खेळण्यासाठी हैद्राबादहून निघाले आहेत.
धर्मशाळा येथील आयपीएल सामना रद्द झाल्यानंतर शुक्रवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू दिल्लीत पोहोचले. त्यांना कडक सुरक्षेत वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये होशियारपूरहून जालंधर रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. यानंतर त्यांना विशेष वंदे भारत एक्सप्रेसने दिल्लीला आणण्यात आले. पंजाब किंग्जच्या एका सूत्राने सांगितले की त्यांचे बहुतेक परदेशी खेळाडू निघून गेले आहेत. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव दिब्यजित सैकिया म्हणाले की, परिस्थितीचा व्यापक आढावा घेतल्यानंतर स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक आणि ठिकाण जाहीर केले जाईल.
शनिवारी संध्याकाळी ५ वाजता अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर या दोन्ही देशांत युद्धबंदी समझौता झाला. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर, आयपीएल २०२५ हंगाम पुन्हा सुरू करण्याबाबतची चर्चा तीव्र झाली आहे. याबाबत माहिती देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, आयपीएलचा चालू हंगाम पुन्हा सुरू करण्याबाबत बोर्ड रविवारी चर्चा करेल. असे वाटत असतानाच रात्री ८.४० वाजता पाकने युध्दबंदीचे उल्लंघन करत भारताच्या विविध शहरांवर हल्ले सुरू केले. पर्यायाने भारताला प्रत्युत्तर देणे भाग पडले व ते भारतीय सैन्याने चोखपणे दिलेही.
पण या अनिश्चित परिस्थितीमुळे जागृत होऊ पाहणारी आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा थंड्या बासणात गुंडाळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या तरी भारत - पाकमधील तणावपूर्ण वातावरण खात्रीशीररित्या शांत होत नाही तोपर्यंत आयपीएलचे अठरावे सत्र पुर्णत्वास जाण्याची कुठलीही शक्यता दूरदूरूनही दिसत नाही.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२