अहिल्यानगर (रमेश जेठे):
नगर–मनमाड रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर असले तरी विळद बायपास चौकात निर्माण झालेली परिस्थिती नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सोलापूर व पुणे मार्गे राहुरी व संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना येथे पोलिसांकडून तासनतास अडवून ठेवले जात असल्याने प्रवाशांची अक्षरशः फरफट होत आहे.
विशेष म्हणजे जेव्हा विळद बायपास चौकात पोलीस तैनात नसतात, तेव्हा वाहतूक सुरळीत असते, मात्र पोलीस यंत्रणा कार्यरत असली की चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. हा केवळ योगायोग आहे की व्यवस्थेतील काहीतरी गंभीर बिघाड, असा सवाल आता नागरिक खुलेआम विचारू लागले आहेत.
प्रवाशांमध्ये महिला, लहान मुले, वृद्ध यांची संख्या मोठी आहे.
▪️ महिलांना बाथरूमची गैरसोय
▪️ लहान मुलांना पाणी–जेवण मिळत नाही
▪️ रुग्णवाहिका व अत्यावश्यक वाहनांनाही अडथळे
या सगळ्यात “हे पोलीसांना माणुसकी म्हणून कळेल का?” असा हताश प्रश्न वाहतूक कोंडीत अडकलेले नागरिक विचारत होते.
अधिक गंभीर बाब म्हणजे, काही वाहनांना आर्थिक व्यवहारानंतर सोलापूर–पुणे मार्गे येणार्या वाहनांना राहुरीकडे सोडले जाते, तर अनेकांना जबरदस्तीने संभाजीनगर मार्गाने वळवले जाते, अशी चर्चा उघडपणे सुरू आहे.
👉 रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली काही गोरखधंदा सुरू आहे का?
👉 समान नियम सर्वांसाठी का नाहीत?
असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
या संपूर्ण प्रकाराकडे स्थानिक आमदार व खासदारांचे दुर्लक्ष ही बाब नागरिकांसाठी अधिक वेदनादायक ठरत आहे. लोकप्रतिनिधींचे मौन हीच या परिस्थितीची सर्वात मोठी शोकांतिका असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
🚨 नागरिकांची थेट मागणी
मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री यांनी या गंभीर प्रकारात तातडीने लक्ष घालावे,
▪️ वाहतूक नियोजनाची चौकशी करावी
▪️ नागरिकांना त्रास न होता पर्यायी मार्गांची स्पष्ट व्यवस्था करावी
▪️ दोषींवर कारवाई करावी
ही केवळ वाहतूक कोंडी नाही, तर सामान्य माणसाच्या संयमाची, वेळेची आणि माणुसकीची परीक्षा आहे.
शासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यास परिस्थिती सुधारू शकते — आणि तोच आजचा सकारात्मक विचार आहे.
नागरिक आजही आशेने पाहत आहेत…
“कोणीतरी तरी जागं होईल!”
000

