पावसाळ्याच्या तोंडावरही नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नागरिक संतप्त, तातडीने कारवाईची मागणी.
एरंडोल, जळगाव जिल्हा – एकीकडे पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये पावसाळ्यापूर्वी नाले व नद्या स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना, एरंडोल शहरातील अंजनी नदीचे रूपांतर गटारगंगेत झाले असून स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष जनतेच्या जीवाशी खेळणारे ठरत आहे.
अंजनी नदी ही एरंडोलची ऐतिहासिक जीवनरेखा मानली जाते. मात्र आज तिच्यात संपूर्ण शहराचे गटार, सार्वजनिक शौचालयांचे पाणी आणि सांडपाणी मिसळले जात असल्याने ती प्रदूषणाचा भयंकर स्रोत बनली आहे. काटेरी झुडपे, प्लास्टिक आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे या परिसरात रोगराई व डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मोकाट कुत्रे आणि डुकरांचा मुक्त वावर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहे.
यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही प्रशासकीय अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपेच्या साखळीत असल्याचा आरोप केला जात आहे. या गंभीर स्थितीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अमोलदादा पाटील यांनी लक्ष द्यावे अशी जनतेची जोरदार मागणी आहे. नदी स्वच्छता मोहीम तातडीने हाती घेण्यात यावी, अन्यथा येत्या पावसाळ्यात साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.